दुकानात शिरली,अन् झाली कोट्याधीश
चीनमध्ये एक महिला किराणा सामग्री घेण्यासाठी घराबाहेर पडली होती, हा प्रवास आपले आयुष्य बदलेल याची कल्पना तिला नव्हती. अचानक पाऊस सुरू झाल्याने तिने वाचण्यासाठी एका दुकानात आसरा घेतला, येथे तिने वेळ घालविण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केली, नशीब म्हणजे महिलेने खरेदी केलेल्या तिकीट क्रमांकालाच लॉटरी लागली आणि तिने 1 लाख 40 हजार डॉलर्स स्वत:च्या नावावर केले आहेत. चीनच्या युन्नान प्रांतातील युक्सीमध्ये ही महिला मुसळधार पावसात अडकून पडली होती आणि स्वत:ला वाचविण्यासाठी ती एका लॉटरीच्या दुकानात शिरली. या महिलेने दुकानदाराला स्क्रॅचकार्ड आहे का, अशी विचारणा केली होती. लॉटरी दोन प्रकारच्या असतात, एक दरदिनी किंवा दर आठवड्याला काढली जाते. दुसरा प्रकार स्क्रॅचकार्डचा असतो, ज्याला खरेदी करताच काही जिंकले आहे की नाही कळते. या स्क्रॅच कार्ड्समध्ये लोक काही रकमेत लाखो युआन जिंकू शकतात. या महिलेने एक पूर्ण स्क्रॅच कार्डचे बुक खरेदी केले ज्यात सुमारे 30 तिकीटे होती. प्रत्येक तिकीटाची किंमत 30 युआन (सुमारे 4 डॉलर) होती. यामुळे एकूण खर्च 900 युआन (जवळपास 125 डॉलर्स) झाला.
या महिलेला केवळ 6व्या तिकीटावरच 10 लाख युआनचे इनाम मिळाले. मी कधीकधी स्क्रॅच कार्ड खरेदी करते, पावसापासून वाचण्यासाठी शिरलेले दुकान स्क्रॅचकार्डचे होते, यामुळे मी काही रक्कम खर्च केली, परंतु त्या बदल्यात मी आता कोट्याधीश झाले आहे, असे ती सांगते.