....पिलांसाठी तिने बांधला खोपा!
बेळगाव : हा निसर्ग म्हणजेच एक अद्भुत चमत्कार आहे. त्याच्या सहवासात प्राणी, पक्षी सुरक्षित राहतातच. याच निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी अत्यंत सुंदर अशी घरटी तयार करतात. एखाद्या कुशल महिलेने कलात्मकरित्या विणकाम करावे, अशा पद्धतीने पक्षी विशेषत: चिमण्या घरटी बांधतात, तेव्हा खरोखरच त्यांचे कौतुक वाटते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरटी बांधताना आपली पिले सुरक्षित ठेवता यावीत, यासाठी थोडी मोकळी जागा ठेवण्याचे भान पक्ष्यांना कोठून येत असेल? वास्तविक पूर्ण घरटे बांधल्यावर थोडीशी मोकळी जागा (ज्याला त्या घरट्याचा दरवाजा असेही म्हणता येईल) ठेवण्यात येते, जेणेकरून पिलांना आतमध्ये सुरक्षितपणे ठेवता येणे शक्य होईल. परंतु येळ्ळूर रोडवर एका पक्ष्याने कदाचित चिमणीने एक घरटे बांधले आहे, ज्याला एका खाली एक असे दोन दरवाजे ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारचे हे घरटे प्रथमच येळ्ळूर रोडवर आढळून आले आहे. ‘तरुण भारत’चे वाचक राजू मरवे यांनी ते टिपून ‘तरुण भारत’ला पाठविले आहे.