Satara News: शिवतीर्थावर घुमला तुतारीचा निनाद, शशिकांत शिंदेंचे जंगी स्वागत
भला मोठा हार, गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी
सातारा : सातारा जिह्यातील जावली तालुक्यातील हुमगावचे सूपूत्र शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आगमन शनिवारी सकाळी जिह्यात झाले. त्यांचे जल्लोषात स्वागत जिह्याच्या सिमेवर करण्यात आले.
शिरवळपासून साताऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे होते. शिवतीर्थाच्या परिसरात दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान तुतारीचा निनाद घुमला होता. शशिकांत शिंदे यांचे आगमन होताच थेट त्यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव करत फटांक्याची आतषबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन पुढे शशिकांत शिंदे हे कराडच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. मुंबईतून साताऱ्याच्या दिशेने ते मार्गस्थ झाल्यापासून त्यांचे स्वागत ठिकठिकाणी होत होते.
सातारा जिह्याच्या सिमेवर नियोजन केल्याप्रमाणे शशिकांत शिंदे यांना भला मोठा हार जेसीबीच्या सहाय्याने घालून फटाके फोडून स्वागत केले. खंडाळा, शिरवळ, निरा येथील कार्यकर्त्यांनी त्यांचे अनोखे स्वागत केले. पुढे पारगाव, वेळे, सुरुर या गावातही त्यांचे स्वागत झाले.
देशभक्त किसन वीर आबा यांच्या स्मारकास अभिवादन करुन त्यांच्या वाहनाचा ताफा वाजतगाजत साताऱ्याच्या दिशेने येताना भुईंज, पाचवड, उडतारे, आनेवाडी येथेही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
साताऱ्यात आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिवतीर्थाच्या परिसरात पारंपारिक वाद्यात तुतारीच्या निनादात त्यांचे आगमन झाले. त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत गुलाब फुलांच्या वर्षावात ते शिवतीर्थ परिसरात पोहचले. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करुन पुढे कराडच्या दिशेने रवाना झाले.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा स्वागत सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी पक्के नियोजन केल्याने जिह्यातील महामार्गावर, गावागावात, चौकाचौकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे बॅनर लागले होते. त्यांच्या स्वागताचे पक्के नियोजन करण्यात आले होते.