वानखेडेवर शर्माचा विक्रमांचा ‘अभिषेक’
इंग्लंडवर 150 धावांनी दणदणीत विजय, शमीचे 3 बळी, वरुण चक्रवर्ती मालिकावीर
वृत्तसंस्था/ मुंबई
‘सामनावीर’ अभिषेक शर्माच्या तुफानी फटकेबाजीच्या साक्षीने वानखेडे स्टेडियमवर रविवारी सुटीच्या दिवशी क्रिकेट शौकिनांना आनंदाचा जल्लोष करण्याची संधी लाभली. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 धावांनी दणदणीत पराभव करीत ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. विक्रमवीर अभिषेकने 13 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडताना 54 चेंडूत जलद 135 धावा झळकाविल्या. टी-20 प्रकारातील अभिषेक शर्माचे हे दुसऱ्या क्रमाकांचे जलद शतक आहे. वरुण चक्रवर्तीला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
भारतीय संघाने पुण्यातील चौथा सामना जिंकून ही मालिका हस्तगत केली होती. रविवारच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर 20 षटकात 9 बाद 247 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 248 धावांचे कठीण आव्हान दिले. पण त्यानंतर भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव 10.3 षटकात 97 धावांत आटोपला. इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली याला केवळ सॉल्ट अपवाद म्हणावा लागेल. फिल सॉल्टने 23 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 55 धावा जमवित एकाकी लढत दिली. सॉल्टने 21 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. इंग्लंडतर्फे टी-20 प्रकारात सॉल्टने नोंदवलेले हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.

भारतीय फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीच्या गड्यासाठी केवळ 11 चेंडूत 21 धावा झोडपल्या. सॅमसनने केवळ 7 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा केल्या. सॅमसन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने फलंदाजीची सूत्रे स्वत:कडे घेतली. अभिषेक आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 8.1 षटकात 115 धावांची शतकी भागिदारी नोंदविली. तिलक वर्माने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा यावेळी अपयशी ठरला. तो केवळ 2 धावावर बाद झाला. अभिषेक शर्माने शिवम दुबेला साथीला घेत भारतीय संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 37 धावांची भागिदारी केली. दुबेने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. हार्दिक पंड्याने 1 षटकारासह 9, रिंकू सिंगने 1 चौकारासह 9, अक्षर पटेलने 2 चौकारांसह 15 धावा केल्या.
अभिषेकचे जलद शतक
अभिषेक शर्माने 54 चेंडूत 13 षटकार आणि 7 चौकारांसह 135 धावा झोडपल्या. टी-20 प्रकारातील भारतातर्फे अभिषेकचे हे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक आहे. अभिषेकने 17 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. तसेच त्याने तिलक वर्मासमवेत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 18 चेंडूत नोंदविली. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 36 चेंडूत झळकाविली. भारताने पॉवरप्लेच्या 6 षटकात 95 धावा जमविताना 1 गडी गमाविला. भारताचे अर्धशतक 17 चेंडूत, शतक 39 चेंडूत, दीडशतक 68 चेंडूत आणि द्विशतक 93 चेंडूत फलकावर लागले. भारताच्या डावामध्ये 19 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे कार्सेने 38 धावांत 3 तर वूडने 32 धावांत 2 तसेच आर्चर, ओव्हरटन व आदिल रशिद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सॉल्टचे जलद अर्धशतक
प्रत्युत्तरादाखल खेळताना सॉल्ट आणि डकेट या सलामीच्या जोडीने इंग्लंडच्या डावाला दणकेबाज सुरुवात केली. शमीच्या पहिल्या षटकात सॉल्टने 17 धावा झोडपल्या. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या षटकात पंड्याच्या षटकात इंग्लंडला केवळ 6 धावा मिळाल्या. पहिल्या 2 षटकात इंग्लंडने 23 धावा जमविल्या होत्या. आणि या सर्व धावा सॉल्टच्या नावावर नोंदविल्या गेल्या. मोहम्मद शमीने आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर डकेटला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. वरुण चक्रवर्तीने कर्णधार बटलरला 7 धावांवर वर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. रवी बिश्नोईला 2 धावावर झेलबाद केले. लिव्हिंगस्टोन चक्रवर्तीचा दुसरा बळी ठरला. त्याने 9 धावा केल्या. सलामीचा फिल सॉल्ट दुबेच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बदली खेळाडू जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 55 धावा जमविल्या. इंग्लंडची यावेळी स्थिती 5 बाद 82 अशी होती. भारतीय गोलंदाजांनी यानंतर इंग्लंडचे शेवटचे 5 गडी 15 धावांत गुंडाळले. 10.3 षटकात इंग्लंडने सर्वबाद 97 धावा केल्या. बेथेलने 1 षटकारासह 10 धावा जमविल्या. इंग्लंडच्या 2 फलंदाजांनी केवळ दुहेरी धावसंख्या गाठली. इंग्लंडने पॉवरप्लेच्या 6 षटकात 68 धावा जमविताना 3 गडी गमाविले. भारतातर्फे शमीने 25 धावांत 3 तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे व अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर बिश्नोईने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 9 बाद 247 (अभिषेक शर्मा 135, शिवम दुबे 30, तिलक वर्मा 24, सॅमसन 16, अक्षर पटेल 15, हार्दिक पंड्या 9, अवांतर 7, कार्से 3-38, वूड 2-32, आर्चर, ओव्हरटन, रशिद प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 10.3 षटकात सर्वबाद 97 (सॉल्ट 55, बेथेल 10, शमी 3-25, चक्रवर्ती 2-25, दुबे 2-11, अभिषेक शर्मा 2-3, बिश्नोई 1-9).