हिंसा भडकविणारे होते शरजीलचे भाषण
न्यायालयाचा आरोप निश्चित करण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शरजील इमामने केवळ हिंसा भडकविणारे भाषण दिले नव्हते. तर तो हिंसा भडकविण्याच्या एका मोठ्या कटाचा सूत्रधार होता अशी टिप्पणी साकेत न्यायालयाने 2019 च्या जामिया हिंसाप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केली आहे. न्यायालयाने यावेळी शरजील विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.
जामिया विद्यापीठानजीक 13 डिसेंबर 2019 रोजी इमामने केलेले भाषण विषारी होते. एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात उभे करणारे आणि प्रत्यक्षात एक द्वेषपूर्ण भाषण होते असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी म्हटले आहे.
शरजील विरोधात पोलिसांनी भादंवि, सार्वजनि संपत्ती क्षति निवारण अधिनियम (पीडीपीपी) आणि शस्त्र अधिनियमाच्या विविध तरतुदींच्या अंतर्गत गुन्हा नोंदविले आहेत. याच गुन्ह्यांप्रकरणी इमाम आणि इतरांच्या विरोधात न्यायालयात सुनावणी झाली आहे. इमामने स्वत:चे भाषण चतुरपणे सादर केले, ज्यात त्याने मुस्लीम समुदायाच्या व्यतिरिक्त अन्य समुदायांचा उल्लेख करणे टाळले होते. परंतु चक्का जामचा त्रास हा सर्वच समुदायाच्या सदस्यांना झाल्याने न्यायाधीशांनी म्हटले आहे.
दिल्लीसारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरात कुठल्याही क्षणी गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराची आवश्यकता असते आणि ते रुग्णालयात पोहोचण्याच्या घाईत असतात. चक्का जमा संभाव्य स्वरुपात त्यांच्यासमोर संकट उभे करते, जर त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो असे न्यायालयाने नमूद केले.
चिथावणी देणे, गुन्हेगारी कट, समुदायांदरम्यान शत्रुत्व निर्माण करणे, दंगल घडवून आणणे, बेकायदेशीरपणे एकत्र येणे, शासकीय कामकाजात अडथळा, विस्फोटक सामग्रीद्वारे हानी घडविण्याचा आरोप शरजीलवर आहे. आरोपी आशू खान, चंदन कुमार आणि आसिफ इक्बाल तन्हा यांनी कटाच्या अंतर्गत चिथावणीसोबत घटनास्थळी हिंसक जमावाच्या कारवायांना भडकविल्याचा आरोप आहे.