युरोपमध्ये ‘शरीया’ कायद्याला स्थान नाही!
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा स्पष्ट संदेश
वृत्तसंस्था/ रोम
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी जॉर्जिया यांनी शरीया आणि इस्लामसंबंधी वक्तव्य केले आहे. युरोपमध्ये इस्लामला प्रोत्साहन दिले जात आहे. इटलीच्या इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरेबियाकडून आर्थिक मदत केली जात असल्याचा आरोप मेलोनी यांनी केला आहे. इटलीत कुठल्याही स्थितीत शरीया कायदा लागू होऊ देणार नाही. इस्लामिक संस्कृतीचे मूल्य आमच्याशी मिळतेजुळते नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युरोपचे इस्लामीकरण करण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु इस्लामिक संस्कृती आणि युरोपीय संस्कृती ही मिळतीजुळती नाही. युरोपीय संस्कृतीची मूल्ये आणि अधिकार हे इस्लामिक संस्कृतीच्या तुलनेत अत्यंत वेगळे आहेत असे मेलोनी म्हणाल्या.
युरोपचे संतुलन बिघडवू पाहणारे काही देश जाणूनबुजून शरणार्थींची संख्या वाढवत असल्याचा आरोप ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केला होता. युरोपमध्ये शरणार्थींच्या समस्येला रोखण्याचा प्रयत्न न केल्यास त्यांची संख्या वाढत जाणार आहे. यामुळे आमच्या क्षमतेवर प्रभाव पडून आम्ही गरजू लोकांना आणि देशांना मदत करू शकणार नसल्याचे सुनक यांनी म्हटले होते.