स्पाइसजेटचे समभाग 5 टक्क्यांनी वधारले
तिमाही निकालानंतरचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर स्पाइसजेटचे समभाग सुमारे 5 टक्क्यांनी वाढले आहेत. कर्जबाजारी असलेल्या एअरलाइन कंपनीने 15 जुलै रोजी दीर्घ कालावधीनंतर त्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले. स्पाइसजेटच्या शेअर्सचे मूल्य गेल्या एका वर्षात जवळपास दुप्पट झाले आहे.
जुलै 2023 मध्ये, शेअरचा भाव सुमारे 30 रुपये होता जो आता सुमारे 58 रुपयांपर्यंत वाढला आहे. या वर्षी, स्पाइसजेटचा हिस्सा 3 टक्क्यांनी घसरला आहे. वर्षाच्या सुरुवातीस, शेअरची किंमत 61 रुपयांच्या जवळ होती.
जानेवारी-मार्च तिमाहीसाठी एकत्रित नफा वार्षिक आधारावर वाढून 127 कोटी रुपयांचा झाला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 6.2 कोटीचा तोटा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एअरलाइनने 298 कोटींचा तोटा नोंदवला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 110 कोटी रुपयांचा होता.
जिओ फायनान्सचा नफा 312.63 कोटींवर
याचदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी जिओ फायनान्सने सोमवारी निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 312.63 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. तो वार्षिक आधारावर 5.81 टक्क्यांनी घसरला आहे. वर्षभरापूर्वी एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला 331.92 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याचदरम्यान जिओ फायनान्सचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात 2.90 टक्के इतका घसरत 344 रुपयांवर बंद झाला. गेले कित्येक दिवस या समभागाचा भाव हा काहीसा स्थिर असाच दिसून आला आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, दीर्घावधीसाठी गुंतवणूकदारांनी थांबल्यास त्यांना हा समभाग चांगला परतावा देऊ शकतो.
कधी झाली कंपनीची स्थापना
जिओ फायनान्सचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न एप्रिल-जून 2024 साठी 161.74 कोटी रुपये होते. जिओ फायनान्स सर्व्हिसेसची स्थापना 22 जुलै 1999 रोजी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून करण्यात आली. यानंतर कंपनीचे नाव बदलून रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड असे करण्यात आले. 25 जुलै 2023 रोजी कंपनीचे नवीन प्रमाणपत्र जारी करण्यात आले आणि कंपनीचे नाव बदलून ‘जिओ फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड’ असे करण्यात आले. कंपनी विमा ब्रोकिंग आणि पेमेंट अटींसह आर्थिक सेवा प्रदान करते.