बजाज हाऊसिंगच्या समभागाने केले मालामाल
बाजारात 114 टक्के दिला परतावा : 150 रुपयांवर सुचीबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओची शेअर बाजारामध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. एकाच झटक्यामध्ये गुंतवणूकदारांना 114 टक्के परतावा प्राप्त करता आला आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ सोमवारी शेअर बाजारात सुचीबद्ध झाला आहे. बीएसईवर समभाग 150 रुपये प्रति समभाग याप्रमाणे लिस्ट झाला. या समभागाची इशू किंमत 70 रुपये इतकी होती. या तुलनेत पाहता गुंतवणूकदारांना 114 टक्के इतका भक्कम परतावा प्राप्त करता आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईवर सदरचा समभाग 150 रुपये प्रति समभाग याप्रमाणे सूचीबद्ध झाला आहे. बाजारातील तज्ञांच्या अंदाजानुसारच आयपीओ सूचीबद्ध झाला असल्याचे दिसून आले आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली प्राप्त झाली आहे.
विक्रमी अर्ज
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओकरिता जवळपास 90 लाख अर्ज आले होते. अर्ज दाखल होण्यामध्येही बजाजचा हा विक्रमच मानला जात आहे. याआधी टाटा टेक्नॉलॉजीजला 73.5 लाख जणांनी अर्ज केला होता. सदरचा आयपीओ 63 पट सबक्राईब झाला होता.
किती रक्कम उभारणार
9 ते 11 सप्टेंबर या दरम्यान बोली लावण्यासाठी आयपीओ खुला होता. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 6560 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. 66 ते 70 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत निश्चित करण्यात आली होती.