विराटबद्दल खोटी माहिती ‘शेअर’ केली : डीव्हिलियर्स
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘ब्रेक’ घेण्यास भाग पाडणाऱ्या वैयक्तिक कारणांबद्दल ‘खोटी माहिती’ शेअर करून आपण भयंकर चूक केली असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डीव्हिलियर्सने म्हटले आहे. प्रत्यक्षात तिथे काय परिस्थिती ओढवलेली आहे याची आपल्याला कल्पना नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या ‘यूट्युब चॅनल’वर डीव्हिलियर्सने दावा केला होता की, कोहलीने दुसऱ्या अपत्याच्या आगमनामुळे इंग्लंडविऊद्ध सुरू असलेल्या मायदेशातील मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. गुऊवारी रात्री येथे सुरू असलेल्या ‘एसए टी-20’ स्पर्धेच्या वेळी निवडक माध्यमांशी संवाद साधताना त्याने त्या विधानापासून कोलांटी मारली. कुटुंब प्रथम येते. मी माझ्या ‘यूट्युब चॅनल’वर म्हटल्याप्रमाणे त्याला प्राधान्य राहायला हवे. मी त्याच वेळी एक भयंकर चूक केली. चुकीची माहिती शेअर केली, जी अजिबात खरी नव्हती, असे डीव्हिलियर्स म्हणाला. तो या स्पर्धेचा ‘ब्रँड अॅम्बॅसॅडर’ आहे.
मला असे वाटते की, विराट आणि त्याच्या कुटुंबासाठी जे काही चांगले आहे ते प्रथम येते. तेथे काय चालले आहे ते कोणालाही माहिती नाही. मी फक्त त्याला शुभेच्छा देऊ शकतो. या ‘ब्रेक’चे कारण काहीही असो, मला आशा आहे की, तो अधिक मजबूत आणि चांगला, निरोगी, ताजातवाना होऊन परत येईल आणि जगाचा सामना करण्यास सिद्ध होईल, असे डीव्हिलियर्स म्हणाला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत कोहली खेळण्याची शक्यता नाही.
दरम्यान, या संवादादरम्यान डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलताना म्हणाला की, टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवची कामगिरी पाहण्यास तो उत्सुक आहे. त्याच्या मते, भारत हा विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. डीव्हिलियर्स हा मूळ ‘360 डिग्री’ खेळणारा फलंदाज असून यादवचे फटक्यांच्या विस्तृत श्रेणीमुळे पुढील ‘मिस्टर 360 डिग्री’ असे वर्णन केले जाते. टी-20 विश्वचषकात लक्ष ठेवण्यासारखे बरेच खेळाडू आहेत. मात्र मला सूर्यकुमार यादवची फलंदाजी बघायला आवडते. मी त्याचा मोठा चाहता आहे आणि आशा आहे की, त्याच्यासाठी सदर स्पर्धा चांगली जाईल, असे त्याने पुढे सांगितले.
यावर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून भारत आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाच्या बाबतीत वाट्याला येणारी हुलकावणी रोखू शकतो, असेही त्याला वाटते. मी भविष्यवेत्ता नाही. पण मला असे वाटते की, भारत हा आघाडीच्या दावेदारांपैकी एक आहे. आयपीएल इतकी वर्षे सुरू आहे आणि भारतीय क्रिकेटचा पाया त्यामुळे खरोखरच मजबूत झाली आहे, याकडे डीव्हिलियर्सने लक्ष वेधले. ‘टी-20’ विश्वचषकापूर्वी ‘आयपीएल’ होणार असल्याने खेळाडूंमध्ये थकवा येण्याची भीती त्याने फेटाळून लावली. जरी ‘आयपीएल’ आणि विश्वचषक यात फारसे अंतर नसले, तरी दोन्ही टी-20 स्वरुपात होणार आहेत. तेथे गोलंदाजांना एका दिवसात चार षटके टाकावी लागतात. हे कसोटी क्रिकेटसारखे नाही, जेथे तुम्हाला दररोज 15-20 षटके टाकावी लागतात, असे मत डीव्हिलियर्सने व्यक्त केले.