पश्चिम विभागाचे नेतृत्व शार्दुल ठाकुरकडे
वृत्तसंस्था / मुंबई
2025-26 च्या क्रिकेट हंगामातील होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघाच्या कर्णधारपदी मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकुरची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर स्पर्धा सप्टेंबरमध्ये खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, श्रेयस अय्यर तसेच ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. पश्चिम विभाग संघात मुंबईच्या 7 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. सौराष्ट्रचा हार्वीक देसाई आणि महाराष्ट्राचा सौरभ नवले यांनाही संधी देण्यात आली आहे. दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश असून सदर स्पर्धा पूर्वी प्रमाणेच विभागीय फॉर्मेटनुसार खेळविली जाणार आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा इंडिया अ, इंडिया ब, इंडिया क व इंडिया ड या चार संघामध्ये खेळविली गेली होती. 2023-24 च्या हंगामात खेळविण्यात आलेल्या विभागीय पद्धतीच्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत द. विभागाने विजेतेपद मिळविले होते.
पश्चिम विभाग संघ: शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, ऋतुराज गायकवाड, जयमित पटेल, मनन हिंगरेजा, सौरभ नवले, एस. मुलानी, तनुष कोटीयान, धरमेंद्र सिंग जडेजा, तुषार देशपांडे आणि अरझान नागवासवाला.