मुंबई रणजी संघाच्या कर्णधारपदी शार्दुल ठाकुर
वृत्तसंस्था / मुंबई
2025-26 च्या रणजी हंगामासाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी अष्टपैलू शार्दुल ठाकुरची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचा रणजी स्पर्धेतील सलामीचा सामना जम्मू काश्मीरबरोबर 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान श्रीनगरमधील शेर ए काश्मिर स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई क्रिकेट निवड समितीने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी 16 जणांचा संघ जाहीर केला असून सर्फराज खान आणि अजिंक्य रहाणे यांचा संघात समावेश केला आहे. यापूर्वी मुंबई संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले होते. आता शार्दुल ठाकुर हा रणजीच्या नव्या हंगामासाठी रहाणेचा उत्तराधिकारी राहील. गेल्या वर्षीच्या रणजी हंगामात जम्मू काश्मीर संघाने मुंबईला 5 गड्यांनी पराभूत करुन अनपेक्षित धक्का दिला होता. यावेळी रणजी स्पर्धेत मुंबईचा इलाईट ड गटात समावेश असून या गटात हिमाचल प्रदेश, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, छत्तीसगड आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे.
मुंबई संघ : शार्दुल ठाकुर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद, हार्दीक तमोरे, सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सर्फराज खान, शिवम दुबे, मुलानी, तनुष कोटीयन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोजा, इरफान उमर, मुशिर खान, अखिल हेरवाडकर आणि रॉयस्टन डायस.