पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शरथ कमल ध्वजधारक
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू व विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन शरथ कमल हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजधारक असेल तर महिला बॉक्सर एमसी मेरी कोमची भारताच्या ऑलिम्पिक पथकप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व जण ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याने शरथ कमल हा आपल्या पथकाची एकता आणि आत्म्याचे प्रतीक आहे, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हटले आहे. ‘मागील तीन आठवडे माझ्यासाठी अश्विसनीय असेच होते. कारण ऑलिम्पिकसाठी पात्र होईन की नाही, याची शाश्वती नव्हती. पण गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये माझ्याकडून शानदार खेळ झाल्याने मानांकनात 54 स्थानांची झेप घेता आली. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता मिळाली आणि आता ध्वजधारक म्हणून निवड झालीय,’ असे शरथ कमल म्हणाला. माझ्यासाठी हा सर्वोच्च क्षण असून परिकथेसारखेच वाटत आहे. कारण माझी ही पाचवी व शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. याशिवाय जगभरातील फार कमी टेबल टेनिसपटूंना असा बहुमान मिळाला आहे, असेही तो म्हणाला.