For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागा वाटपावर शरद पवारांची शिष्टाई

06:45 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागा वाटपावर शरद पवारांची शिष्टाई
Advertisement

काँग्रेस-ठाकरे गटातील जागा वाटपावरील तिढा सुटणार, काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

Advertisement

प्रतिनिधी / ► मुंबई

मागच्या गुरूवारच्या रात्री बीकेसीतील सॉफीटेल हॉटेलमधील चर्चेपासून सुरू झालेला काँग्रेस-ठाकरे गटातील जागा वाटपावारील तिढा आता सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिष्टाई केल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडशी चर्चा करून या दोन घटक पक्षात समेट घडवून आणला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा जागा वाटपाचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

शरद पवारांचा निरोप घेऊन जयंत पाटील मातोश्रीवर गेले होते. शरद पवार आणि काँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीची माहिती त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे. त्यामुळे आता खंडित झालेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात आघाडी एकत्र हवी : संजय राऊत

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात आघाडी एकत्र राहायला हवी. या संविधान विरोधी शक्तींचा, महाराष्ट्रात लुटणाऱ्या शक्तींचा, महाराष्ट्राच्या दुश्मनांचा पराभव आघाडी म्हणून एकत्र राहून करू असे राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र मागतोय महापरिवर्तन : मल्लिकार्जुन खर्गे

भाजपा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठी शत्रू असून महाराष्ट्राने ठरवले आहे की, भाजपाच्या डबल इंजिन सरकारला हटविल्यावरच शेतकऱ्यांचे भले होणार आहे. कारण महाराष्ट्र मागतोयं महापरिवर्तन असे आवाहन काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. खर्गे यांनी त्यांच्या मॅसेजमध्ये भाजपाच्या कालावधीत राज्यात झालेल्या घटनांचा उल्लेख करत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले आहेत. खरगे यांनी, 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीच्या निधीमध्ये मोठी कपात, 20,000 कोटींच्या वॉटर ग्रिडच दिलेले खोटे वचन, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं फसवं आश्वासन, अन्नदात्याला नुकसानभरपाई देण्यास नकार, विमा कंपन्यांना 8,000 कोटींचा फायदा, कांदा आणि सोयाबीनच्या निर्यातबंदी आणि जास्तीच्या निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांवर भार तसेच कापूस आणि सोयाबीन च्या उत्पादनात प्रचंड घसरण आणि राज्याच्या दुग्ध सहकारी संस्थांमध्ये संकट जे सरकारनेच मान्य केल असल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने ठरवले आहे की भाजपच्या डबल इंजिन सरकारला हटविल्यावरच शेतकऱ्यांचे भले होणार असून यावेळी महाराष्ट्र मागतोय महापरिवर्तन असे म्हटले आहे.

काँग्रेस-शिवसेनेत  वाद नाही : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून जागा वाटपाची लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या 96 जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी पुन्हा चर्चा होणार असल्याचे सांगितले. चर्चेनंतर लगेचच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जागा वाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात वाद झाल्याच्या मुद्यावरून पटोले दिल्लीत बोलत होते.  पटोले म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या वृत्ता तथ्य नसून  भाजपा जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होण्याच्या भितीने भाजपा अशी खेळी करत असल्याचा आरोप ही पटोले यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान भाजपाचे हिंदू प्रेम नकली असून मोदी सत्तेत आल्यापासून ते स्वयंभू विश्वगुऊ असल्याचा प्रचार करत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

Advertisement
Tags :

.