Sharad Pawar : नाराज न होता कामाला लागा, निवडणुकांसाठी पवारांचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस
शरद पवार यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन, विमानतळावर केले स्वागत
कोल्हापूर : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठीचे निर्णय त्या-त्या जिह्यातील जिल्हाध्यक्षांकडेच द्यावेत असे पक्षाचे धोरण निश्चित करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे नाराज न होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
दोन दिवसांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पवार गुरुवारी कोल्हापूर विमानतळावर आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांच्यावतीने पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पवार यांनी विमानतळाच्या व्हीआयपी कक्षामध्ये कोल्हापूर जिह्याच्या राजकारणाचा आढावा घेऊन झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालावरही चर्चा केली.
यावेळी नाराज न होता कामाला लागा, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रदेश राष्ट्रवादीकडून केले जाईल, असे पवार यांनी नमूद केले. खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे काम चालू असल्याचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर कोल्हापूर जिह्यातील विविध बाबींवर देखील चर्चा करण्यात आली.
त्यानंतर पवार पुढील दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्लाकडे रवाना झाले. पवार शुक्रवारी पुन्हा कोल्हापूर जिह्यातील गवसे, आंबोली येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सरचिटणीस सुनील देसाई, युवक अध्यक्ष रोहित पाटील, ज्येष्ठ नेते बाजीराव खाडे उपस्थित होते. त्यांच्या सोबत प्रतिभाताई पवार देखील उपस्थित होत्या.