प्रामाणिक निष्ठा अन् निवडून येण्याची क्षमता...हाच उमेदवारीचा निकष! ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले संकेत
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष अथवा महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ चालली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी कोणाला? याचे उत्तरादाखल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मागील काही वर्षांतील राजकीय घडामोडीत दाखवलेली पक्षनिष्ठा, सामाजिक कामातील सहभाग, निवडून येण्याची क्षमता आणि स्थानिक नेत्यांची सहमती हे उमेदवारीचे निकष असल्याचे बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. समरजितसिंह घाटगे बदल घडवून आणू शकतात, हे त्या मतदारसंघातील लोकांच्या भावनेवरुनच हेरले आहे, घाटगेंची उमेदवारीची मागणी लोकांकडून आली आहे. त्यांना उमेदवारी मिळावी ही आपली इच्छा आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार सोमवारपासून चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कागल येथे जाहीर सभेत समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पवार, समरजितसिंह घाटगे यांनी प्रमुख उपस्थिती होती.
जागा वाटपाबाबत येत्या आठ, नऊ किंवा दहा तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत निर्णय होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर कागलमधील समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी आताच का जाहीर केली? हा विरोधभास नाही का? यावर पवार म्हणाले, समरजितसिंह मागील काही वर्षात सामाजिक कार्यात अग्रभागी आहेत. त्यांनी संस्था खूपच चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शीपणे चालवल्या आहेत. जनसंपर्क उत्तम आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याचा योग्यवेळी निर्णय घेतला.
माझ्या 55 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत लोकांची मने ओळखतो. कागल मतदारसंघात समरजित यांना मिळणारा प्रतिसाद आणि लोकभावना निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे दर्शवतात. समरजित घाटगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत, ही लोकांची भावना आहे. त्यांना उमेदवारी मिळावी, ही माझी इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होईल. त्यांच्या उमेदवारीची मी परस्पर घोषणा केलेली नाही. परंतु आता कागलमध्ये समरजित घाटगे यांची विधानसभा मतदारसंघात गरज आहे.
शरद पवार म्हणाले, मागील काही वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडीत आमच्या सोबत दाखवलेली प्रामाणिक निष्ठा, हा आता उमेदवारी देतानाचा पहिला निकष असेल. त्या व्यक्तीचे राजकीय, सामाजिक काम तसेच निवडून येण्याची क्षमताही तपासली जाईल. महाविकास आघाडीचे स्थानिक नेत्यांचे मतही उमेदवारी देताना महत्वाचे असेल. ज्या भागात ज्यांचं काम आहे त्यांचं मत जाणून घेतले जाईल. इतकी वर्षे मी राजकारणात आहे. लोकांच्या मनातील भावना मला कळते. काल कागलच्या जनतेच्या डोळ्यात मला समरजित यांच्याबाबत भावना समजत होती. नागरिकांमध्ये ज्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे.
कोण रे तो सुक्काळीचा...
जगाच्या पाठीवर मला आवडणारी काही ठिकाणं आहेत, त्या कोल्हापूर आहे. म्हणूनच जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा कोल्हापूरला आवर्जून येतो. इथलं वातावरण, माणसं आणि तांबडा-पांढरा रस्सा आवडतो. हे सांगत खास कोल्हापुरी आठवण सांगताना पवार म्हणाले, काल कोल्हापुरातून माझ्या वाहनांचा ताफा जात असताना एका चौकात सर्व बाजूने वाहनं थांबलेली पाहिली. मी म्हटलो, आपल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय.., तर गाडीतील एकजण म्हणाला, लोकांना अप्रुप वाटते. मी उत्तरलो. कोल्हापुरात मी लहानपणापासून येतोय. असा वाहनांचा ताफा आणि अडवणुकीवर लोक काय म्हणतात, ते मी माझ्या कानाने ऐकले आहे. अशाप्रकारे वाहन थांबवून ताफा जाऊ लागला की कोल्हापूरकर म्हणतात, आमची वाट अडवलीय.., कोण रे तो सुक्काळिचा जात आहे. कुठल्या सुक्काळीचा वाहन ताफा आहे.
जागा वाटपाबाबत चार दिवसांत बैठक
महाविकास आघाडीकडे आता उमेदवारांची मांदियाळी आहे अन् लोकसभेला चणचण होती, असे काही नाही. तेव्हा आणि आताही मात्तब्बर इच्छुकांची मोठी संख्या महाविकास आघाडीकडे आहे. जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय अथवा बैठक झालेली नाही. येत्या 8 किंवा 9 तारखेला काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होईल. या बैठकीत जागा वाटपाबाबत निर्णय होईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.