शारदीय नवरात्रोत्सव 22 पासून
घटस्थापना, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी, महानवमी मुख्य दिवस
बेळगाव : येत्या शनिवारी (दि. 20) रात्री 12.16 नंतर अमावास्या सुरू होत असून रविवारी (दि. 21) उत्तररात्री 1.23 पर्यंत अमावास्या आहे. भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावास्या असे म्हटले आहे. आपले पूर्वज, दिवंगत झालेल्या घरातील वडीलधारी मंडळींचे स्मरण करण्याच्या काळातील (पितृपंधरवडा) अखेरचा दिवस हा सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखला जातो. सोमवारी (दि. 22) अश्विन महिन्याची सुऊवात होत आहे. या दिवसाला घटस्थापना असे म्हटले असून शारदीय नवरात्र साजरी करणाऱ्या मंदिर, घरांतून घट पूजन होत असते. शरद ऋतुमध्ये होणारे नवरात्र तसेच लक्ष्मीचे एक रूप मानले गेलेल्या शारदेची आराधना करण्याचा काळ म्हणून शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले आहे.
घटस्थापना ते महानवमी असे एकूण 9 दिवस घट पूजन होत असते. यंदा मात्र 10 दिवस घट पूजन होणार आहे. कारण अश्विन शुक्ल तृतीया ही तिथी दोन दिवस म्हणजे वृद्धितिथी आली आहे. बुधवार (दि. 24) व गुऊवारी (दि. 25) असे दोन दिवस तृतीया आहे. पंचमी (ललिता पंचमी), दुर्गाष्टमी (जागर), नवमी (महानवमी- खंडेनवमी) असे महत्त्वाचे दिवस आहेत. ललिता पंचमी शुक्रवारी (दि. 26), जागर मंगळवारी (दि. 30) व महानवमी बुधवारी (दि. 1 ऑक्टोबर) आहे. गुऊवार दि. 2 ऑक्टोबरला विजया दशमी (दसरा) असून विजया दशमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सीमोल्लंघन होत असते.