For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि

06:31 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
अहंता ममता गेली झाला तो शांति रूप चि
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, राजा जो सदैव ईश्वरस्मरण करत असेल त्याच्या हातून कायम सत्कार्ये घडत असतात. त्याने मनाला ईश्वराच्या विचारात गुंतवून ठेवले असल्याने इतर गोष्टीतून त्याला कोणत्याही अपेक्षा नसतात. इच्छा, अपेक्षा नसल्याने विषयसेवन मिळालं तर ठीक नाही मिळाले तरी ठीक अशी त्याची मन:स्थिती असते.

म्हणून कायम समाधानी राहण्यासाठी सतत ईश्वराचे नामस्मरण करावे. सर्वांनाच त्रितापातून निर्माण होणारी दु:खे भोगावी लागतात. समाधानी मनुष्य त्रिविध तापातून मुक्त होतो. चिंता, व्याधी, वृद्धपणातील परावलंबित्व, शोक अशी मानसिक दु:खे तसेच देहामुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना यांना अध्यात्मिक ताप असे म्हणतात. सभोवतालचे लोक, चोर दरोडेखोर इत्यादींच्यामुळे तसेच प्राण्यांच्यामुळे जे दु:ख भोगावे लागते त्याला आधिभौतिक ताप असे म्हणतात. महापूर, वादळ, भूकंप अशा नैसर्गिक कारणामुळे जे दु:ख भोगावे लागते त्याला अधिदैवीक ताप असे म्हणतात. हे ताप मानसिक त्रासामुळे भोगावे लागतात. त्यांना क्लेश असे म्हणतात.

Advertisement

स्थिरबुद्धि, स्थिरप्रज्ञ व्यक्तीच्या आयुष्यातही सामान्य माणसाप्रमाणे वर वर्णन केलेले ताप येत असतात पण त्याच्या मनात समाधान विलसत असल्याने तो अशा निरनिराळ्या प्रकारच्या तापदायक काळात स्वत:ला क्लेश करून न घेता स्वस्थचित्त असतो. इच्छा पूर्ण होत नाहीत असे दिसले की, माणूस रागावतो. आपलंच म्हणणे बरोबर आहे, मी शहाणा, मी सांगतोय तेच खरे असे वाटायला लागून देहबुद्धी जोर करते. त्यामुळे ईश्वराचा विसर पडतो. तो ईश्वरापासून लांब जाऊ लागतो. परिणामी बुद्धी भरकटून त्याचा सर्वनाश होतो. असं घडू नये म्हणून बाप्पांनी काय सांगितलंय ते आपण पुढील श्लोकात पाहू.

विना प्रसादं न मतिर्विना मत्या न भावना ।

विना तां न शमो भूप विना तेन कुत । शुखम् । 63

अर्थ - समाधान रुपी प्रसाद असल्यावाचून बुद्धि नाही, बुद्धीवाचून भावना नाही, भावनेवाचून शांति नाही आणि राजा, शांतीवाचून सुख कोठले?

विवरण-आजकाल प्रत्येकजण मन:शांती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. अमुक एक केलं की, शांती मिळेल असे सांगणारेही खूपजण आहेत व त्याप्रमाणे वागणारेही बरेच आहेत. कुणी योगासने करायला सुचवतं, कुणी धार्मिक कर्मकांडे करायचा सल्ला देते तर कुणी धर्मग्रंथ वाचा, दानधर्म करा म्हणून सांगते. पण ही सगळी वरवरची मलमपट्टी असते. अशा उपायांनी काहीकाळ मन शांत असते कारण ही तात्पुरती उपाययोजना असते. कायमची मन:शांती मिळवायची असेल तर चित्तात समाधान विलसत असायला पाहिजे आणि त्यासाठी इच्छा अपेक्षा ठेवणे विसरायला हवे. म्हणजे त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून मन अस्वस्थ होणार नाही. सदैव मन:शांती मिळवण्यासाठी जीवनात जे वाट्याला येईल ते स्वीकारण्याची तयारी ठेवली की, बुद्धी स्थिर होईल, सर्वांच्याविषयी सद्भावना निर्माण होईल आणि मन सदैव प्रसन्न राहील. प्रसन्न मनात नेहमीच शांती वास करून असते. या बाप्पांच्या सांगण्याची पुष्टी करताना भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात,

कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये। आत्म्यात चि असे तुष्ट तो स्थित-प्रज्ञ बोलिला । 2. 55 । ज्याला आपल्या आत्मस्वरुपाची ओळख आहे तो स्थितप्रज्ञ मनुष्य समोर दिसणाऱ्या मिथ्या जगाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही. असा निरपेक्ष मनुष्य पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेला तरी तो सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि नि:स्पृह । अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि । 2. 71 । निस्पृह, निरिच्छ असलेला मनुष्य श्रीमंत असतो असंही नाही. तो कोणत्याही आर्थिक परिस्थितीतला असला तरी कायम सुखी असतो. तुमच्या आसपास अशी कोण माणसे असतील तर तुम्हाला ही गोष्ट लगेच पटेल.

क्रमश:

Advertisement
Tags :

.