For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी लक्ष्मीदेवीचा शांती पूजन मंगलमय वातावरणात

10:14 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी लक्ष्मीदेवीचा शांती पूजन मंगलमय वातावरणात
Advertisement

ढोल-ताशांचा गजर-फटाक्यांची आतषबाजी : गेल्या आठ दिवसापासून उत्साहाचे वातावरण :  बुधवारी यात्रेची होणार सांगता  

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर येथे चालू असलेल्या लक्ष्मी यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. उद्या बुधवार दि. 1 मे रोजी लक्ष्मी यात्रेची सांगता होणार आहे. गेले आठ दिवस तिन्ही भागात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बुधवार दि. 24 एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली. त्यानंतर दररोज ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. ढोल ताशांच्या गजरात, धनगरी ढोलच्या आवाजात, फटाक्यांच्या आतशबाजीत महालक्ष्मी देवीचा जयजयकार करत भंडाऱ्याची उधळण करत उत्साही वातावरणात महालक्ष्मी देवीला रथावर विराजमान करण्यात आले. त्यानंतर बेनकनहळ्ळी गावातील प्रमुख मार्गावरून रथ मिरवणूक काढल्यानंतर लक्ष्मीमूर्ती गणेशपूर, ज्योतीनगर, सरस्वतीनगर अशा विविध भागातून मिरवणूक जल्लोषात काढली. ठिकठिकाणी लक्ष्मीदेवीचे पूजन करण्यात आले. बुधवार संध्याकाळी चार वाजता महालक्ष्मी देवीचे सीमेकडे प्रयाण झाल्यानंतर उत्सवाची सूर्यास्ताच्यावेळी सांगता होणार आहे. यावेळी देखील पारंपरिक वाद्य व धनगरांचे ढोल पथक उपस्थित राहणार आहे.

Advertisement

यात्रा यशस्वी करण्यात कमिटीला यश

राजू कुलकर्णी या पौरोहित्यांनी शांती पूजा केली. पूजेला यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोनाप्पा पाटील व पुजारी सुतार बसले होते. पूजेनिमित्त प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ भोजनासाठी होते. पूजेला खास करून यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व सभासद आवर्जून उपस्थित होते. गेले आठ दिवस यात्रा यशस्वी करण्यासाठी कमिटीने पराकाष्टा केली. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी अत्यंत उत्साही वातावरणात ही यात्रा यशस्वी केली. प्रत्येक विभागवार कमिटीने लक्ष केंद्रीत करून कोणत्याही प्रकारची अडचण भासू दिली नाही. त्यामुळे भाविक देखील या नियोजनाबद्दल अभिनंदन करत होते. याला ग्रामपंचायत कमिटी ग्रामस्थ, युवा वर्ग, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि खास करून महिलांनी प्रयत्न घेऊन ही यात्रा यशस्वी केली आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोनाप्पा पाटील, उपाध्यक्ष आनंद पाटील, खजिनदार जोतिबा देसूरकर, सल्लागार बाळू देसूरकर, लक्ष्मण खांडेकर, कल्लाप्पा पाटील, महेश पाटील, महेश कोलकार, आनंद कोलकार, मोहन कांबळे, परशराम कोलकार या सर्वांच्या प्रयत्नातून यात्रा यशस्वीपणे होत असून, कमिटीला ग्रामपंचायत कमिटी, ज्येष्ठ नागरिक, युवक मंडळे व महिलांनी बरेच साहाय्य केले. एकंदरीत यात्रा मोठ्या उत्साहात व शांततेत होत आहे.

यात्रेत लाखो रुपयाची उलाढाल

यात्रेमुळे लाखो ऊपयांची उलाढाल झाली असून नारळ विक्रेते, पूजा साहित्य, खेळणी, पाळणा, यात्रेसाठी लागणारे साहित्य, आईक्रिम दुकाने, शीतपेय दुकाने, पेट्रोल पंप आदीद्वारे लाखो ऊपयांची उलाढाल दिसून आली.

Advertisement
Tags :

.