For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाजीपूरचा जंगलवाचक शांताराम, वाचा जंगलातील कहाणी….

10:43 AM Jul 06, 2022 IST | Abhijeet Khandekar
दाजीपूरचा जंगलवाचक शांताराम  वाचा जंगलातील कहाणी…
Advertisement

सौरभ मुजुमदार-
काही गोष्टी या नैसर्गिकपणे सदैव एकरूप असतात .अशीच एक प्रत्यक्ष अस्तित्वातील गोष्ट म्हणजे दाजीपूरच्या जंगलातील "शांताराम". ओलवण हे राधानगरी धरणाच्या जलाशयाच्या शेवटच्या टोकाचे छोटे गाव. याच गावातील शांताराम पाटील हे मोलमजुरी करण्यासाठी म्हणून वनखात्यात जाऊ लागले परंतु कालांतराने ते वनसेवक म्हणून सेवानिवृत्त झाले .वन्यजीव खात्यातील मोठमोठे अधिकारी आज देखील यांचे नाव आदराने घेतात.

Advertisement

दाजीपूर व शांताराम यांचे अतूट नातेच आहे लहानपणापासूनच या जंगलात, डोंगर दऱ्याखोऱ्या, वन्यप्राणी यांच्या अंगाखांदयावरच जणू मोठे झालेले हे व्यक्तिमत्व. शैक्षणिक अर्हता नाही परंतु शांताराम सदैव वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत उठबस असल्यामुळे जंगलातील प्राणी,झाडे, फुले, फळे पशुपक्षी यांचे इंग्रजी नाव व माहितीचा जणू चालता बोलता खजिनच म्हणावा लागेल. जंगलाशी शांताराम यांचे असे नाते की कोणता वन्यप्राणी, कोणत्या वेळी ,कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी हमखास खाद्य शोधण्यासाठी अथवा पाणी पिण्यासाठी येणार हे तो आजही अचूक दर्शवितातो. ज्यावेळी याच अभयारण्यात फिरताना वनखात्याच्या पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध नव्हत्या .त्यावेळी सहकुटुंब पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना शांताराम म्हणजे एक भक्कम आधार होता. आपल्या शासकीय सेवेत सदैव प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करणाऱ्या शांताराम यांना आज पर्यंत रात्री अपरात्री सदैव चालत जंगलात फिरताना कोणत्याही वन्य प्राण्याने इजा केलेली नाही.

दाजीपूरच्या जंगलातील "शांताराम".

मध्यंतरीच्या काळात गगनबावडा येथे एक मादी गव्याचे पिल्लू कळपातून भटकत वाट चुकले.त्याला दाजीपूर गावात आणले ते परत जंगलात जाईना म्हणून वनखात्याच्या कार्यालयाच्या परिसरातच शेवटपर्यंत ते फक्त या शांताराम सोबतच राहिले. इतर कोणीही तिच्यापुढे जाण्याचे धाडस केले नाही. दाजीपूरला जाणाऱ्या तत्कालीन पर्यटक ट्रेकर्स व निसर्गप्रेमींना ही "मंगी" नावाची मादी नक्कीच आठवत असणार.

Advertisement

वन्यप्राणी गणती या वनखात्याच्या उपक्रमात वन्यजीव प्रेमी शांताराम यांच्या गटातच रात्री पाणथळ जागी वन्य प्राणी गणतीस उत्सुक असत. कारण शांताराम म्हणजे वन्य प्राण्यांचे दर्शन हमखास होणारच .सांबर, भेकर ,गवा ,अस्वले शेकरू ,अजगर ,बिबट्या या विविध प्राण्यांचे भ्रमण मार्ग व वसतीस्थाने जी आजही दाट जंगलात आहेत ती फक्त शांतारामच दाखवू शकतो. नवीन वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या पायवाटेवरील झाडे छाटणे, कोठे पाणथळ जागा निर्माण करणे ,रस्ते पावसाने वाहून गेल्यास नवीन पायवाट कोठे तयार करणे ,अशा अगदी बारीक सारीक गोष्टींचे प्रशिक्षण हा अशिक्षित शांताराम योग्य पद्धतीने आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर आजपर्यंत देत होता. जंगलात भटकंती करताना शांतता, सोबत धाडस, आत्मविश्वास संयम, जंगलाशी मैत्री याची प्रशिक्षण देणारी चालती बोलती कार्यशाळा म्हणजेच शांताराम होय.

शासकीय सेवे सोबत येणाऱ्या पर्यटकांना ते दाजीपूर मधून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक अडीअडचणीला अहोरात्र मदतीस धावून येणाऱ्या या अवलियाने आजपर्यंत शेकडो पर्यटकांशी मैत्रीचे ऋणानुबंध जोडलेले आहेत .शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला शांताराम पर्यटक ,निसर्ग व वन्यप्रेमी ,वन कर्मचारी, व अधिकारी यांच्यासारख्या असंख्य व्यक्तींच्या मनाच्या कोपऱ्यात मात्र कायमच कार्यरत राहील .कारण फार कमी अशा व्यक्ती भेटतात ज्या जंगलाशी पूर्णपणे नैसर्गिकरित्या एकरूप होऊन जातात. आपल्या पुढील पिढीला हा चालता बोलता मार्गदर्शक ठरणारा हा अवलिया दीपस्तंभ शतायुषी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शांताराम सोबत जंगलात भटकंती करताना अथवा एखादा उपक्रम राबविताना आपल्या सोबत एखादी अचाट, दुर्मिळ, अथवा नैसर्गिक शक्तीच सोबत असते. याचा एक वेगळाच अनुभव आज अखेर अनेक पर्यटक, वन्यजीव प्रेमी, तसेच वन अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. शांताराम व दाजीपूर चे जंगल हे नाते कधीही नसंपणाऱे आहे.

राजू सावंत,
वनविभाग व वन्यजीव विभाग कोल्हापूर

Advertisement
Tags :

.