शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचे आवळेभोजन-कालोत्सव उत्साहात
कुंकळ्ळी : फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचे वार्षिक वनभोजन-आवळेभोजन तथा कालोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाचे खास वैशिष्ट्या श्री शांतादुर्गा देवी व श्री सप्तकोटिश्वर या देवतांना सजविलेल्या नौकेत बसवून बँडवादनाच्या तालावर करण्यात आलेला नौकाविहार आणि तळीत करण्यात आलेले कर्पूरदान हे राहिले.
नेत्रदीपक अशा नौकाविहाराला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून त्याचा आनंद लुटला व कर्पूरदान करण्यात आत्मियतेने भाग घेतला. तत्पूर्वी सकाळी मंदिरात अभिषेक, आरती झाली, त्यानंतर श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवी आणि श्री सप्तकोटिश्वर या देवतांना पालखीत एकत्र बसवून आवळेभोजन करण्यासाठी तळीच्या ठिकाणी प्रस्थान करण्यात आले. तळीतील पाण्याने अभिषेक, आरत्या, प्रसाद झाल्यानंतर दुपारी आवळेभोजन, महाप्रसाद झाला.
सायं. 7 वा. सुरू झालेला नौकाविहार संपल्यानंतर पालखीचे मंदिराच्या सभामंडपात आगमन झाले. त्यानंतर भोजन व गणेशवंदना, दशावतारी नाटक, पारंपरिक कालोत्सव, शंखासुर वध आणि नंतर दहीकाला, आरत्या होऊन उत्सवाची सांगता झाली. यंदा दोडामार्ग येथील बोर्डेकर पारंपरिक दशावतारी नाट्यामंडळाने सादर केलेले दशावतारी नाटक, शंखासुर वध कार्यक्रम भरपूर रंगून शेवटपर्यंत उपस्थित राहून नागरिकांनी त्यांना दाद दिली.