वास्कोत ‘फेक कॉल सेंटर’चा पर्दाफाश
वेगवेगळ्या राज्यांतील तब्बल 24 संशयितांना अटक : 24 लॅपटॉप, 24 हेडफोन, 8राउटर, 26 मोबाईल जप्त ,सायबर गुन्हा विराधी विभाग पोलिसांनी केली कारवाई
पणजी : अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून सायबर गुह्यांमध्ये गुंतलेल्या झुआरीनगर वास्को येथील ‘फेक कॉल सेंटर’चा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात तब्बल 24 संशयितांना अटक केल्याची माहिती सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली आहे. संशयितांकडून 24 लॅपटॉप, 24 हेडफोन, 8 इंटरनेट राउटर व 26 मोबाईल फोन जप्त केले आहेत. गेल्या एक महिन्यापासून कॉल सेंटर कार्यरत होते. एका महिनाभरात संशयितांनी सुमारे 1 कोटी ऊपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. काल सोमवारी येथील पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक राहुल गुप्ता बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पोलिस महासंचालक आलोक कुमार आणि सायबर गुन्हा विरोधी विभागाचे निरीक्षक दीपक पेडणेकर उपस्थित होते.
अटक केलेल्यांमध्ये मयंक कौशिक (38, नवी दिल्ली), नितीन नारायण सैनी (36, दिल्ली), आशिष अखिलेशकुमार वाजपेयी (33, हरियाणा), विकास दीप श्रीवास्तव (31, हरियाणा), समीर मूसा (37, अंदमान आणि निकोबार), गगनदीप मनजीत सिंग (35, लुधियाना), पुष्पेंद्र प्रतापसिंग (31, फतेहपूर, उत्तर प्रदेश), आकर्ष अनुराग मिश्रा (24, वाराणसी, उत्तर प्रदेश), अखिलेश गुप्ता (38, नवी दिल्ली), गुलझार नझीर अहमद (29, नवी दिल्ली), लक्ष्या महेश चंद शर्मा (23, नवी दिल्ली), प्रियांशू हरिओम शर्मा (20, हरियाणा), आशिष अनिल मुरकर (27 मुंबई, महाराष्ट्र), शाहऊख अझीझ अहमद (30 उत्तरप्रदेश), मोहम्मद निजामुद्दीन अझीझ (21 नवी दिल्ली), तुषार सुरेश वाणी (22 वडोदरा गुजरात), मोक्ष राजपूत (27 गाजियाबाद उत्तर प्रदेश), लवकेश सोलंकी (23 नवी दिल्ली), केवल आगरवाडकर (20 मुंबई, महाराष्ट्र), चिराग वर्मा (44 दिल्ली ), दमन चंद्रा (23 पंजाब), शाहबाज खान (26 नवी दिल्ली), साक्षर आनंद (25 नवी दिल्ली), नफीवानी मेहराजुद्दी नवानी (29 नवी दिल्ली) यांचा समावेश आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. संशयितांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) च्या 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66- (डी) अंतर्गत गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक
संशयितांनी फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली आहे. कर्ज देणाऱ्या कंपनीचे एजंट, अॅमेझॉन मुख्यालयातील कर्मचारी, बँक कर्मचारी, सरकारी एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याचे खोटे सांगून अमेरिकन नागरिकांना मोठी रक्कम देण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांची ऑनलाईन फसवणूक केली. गिफ्ट कार्ड्स, बिटकॉइन्स आणि खोट्या सबबीखाली कर्ज सहाय्य, खरेदी पेमेंट आणि तांत्रिक सहाय्य यासह इतर माध्यमांच्या स्वरूपातही अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना मिळत होते 40 हजार रुपये वेतन
मयंक कौशिक हा या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. इतर संशयित कर्मचाऱ्यांना ऑनलाइन एजन्सीद्वारे नियुक्त केले होते. त्यांना फसवणूक कशा प्रकारे करायची या बाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांचा मासिक पगार 35 हजार ते 40 हजार ऊपये इतका होता, असे तपासात उघड झाले आहे. अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक सर्वेश सावंत आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन ओळखण्यासाठी पुढील तपास सुरू आहे असेही राहुल गुप्ता यांनी सांगितले.