शंकरपेठ-जांबोटी रोड मलप्रभा नदीवरील पुलावर साचले पाणी
पुलावरील रस्त्यावर खड्डे, वाहनधारकांना त्रास
वार्ताहर /किणये
शंकरपेठ, जांबोटी रोड येथील मलप्रभा नदीवर असलेल्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये सध्या पावसाचे पाणी साचले आहे. पाणी अन् खड्डे असल्याने वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी दुचाकीस्वार पडत आहेत. वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. खानापूर-जांबोटी रोड, शंकरपेठजवळ मलप्रभा नदीवर एक मुख्य पूल आहे. खड्ड्यांमुळे या पुलावरून वाहतूक करणे अवघड बनले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी दिली आहे.केवळ पावसाची रिमझिम झाली तरी या पुलावरील खड्ड्यांमध्ये अधिक प्रमाणात पाणी साचते. तसेच पुलावरील रस्ता उखडून गेला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून ये-जा करणे जोखमीचे ठरू लागले आहे.या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिक करीत आहेत. ओलमणी, ओतोळी, मोदेकोप, जांबोटी, कुसमळी, बैलूर, किणये, जानेवाडी, रणकुंडये आदींसह पश्चिम भागातील वाहनधारकांची तसेच खानापूरला ये-जा करणाऱ्यांची रोज मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वर्दळ असते.
प्रशासनाला जाग कधी येणार?
मी शिक्षक आहे. जांबोटीला मला रोज ये-जा करावी लागते. शंकरपेठ जवळील पुलावरील रस्ता खचून गेला आहे. खड्डे पडले आहेत. याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे? कारण गेल्या दोन तीन वर्षापासून या पुलाची परिस्थिती अशीच आहे. रात्रीच्यावेळी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. एखादी दुचाकी किंवा चारचाकी पुलावरून नदीत कोसळल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?
- पांडुरंग गुरव, मोदेकोप