शंकर चोडणकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
सांत आंद्रेचे झेडपी धाकू मडकईकर यांची लागणार वर्णी
पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी काल शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पदावर आता सांतआंद्रेचे समाजकार्यकर्ते, तसेच तीन वेळा जिल्हा पंचायतीवर निवडून आलेले धाकू मडकईकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शंकर चोडणकर यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे पक्षाच्या निर्देशावरून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. चोडणकर यांनी पंचायत संचालकांकडे आपला राजीनामा दिल्यामुळे येत्या सात दिवसांत नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे. धाकू मडकईकर यांना याबाबत विचारले असता म्हणाले, भाजप पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण घेण्यास तयार आहे. आतापर्यंत पक्षाच्या सांगण्याप्रमाणेच कार्य केलेले आहे. आपणास उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद दिले जाईल, असे पक्षाने यापूर्वीच सांगितले होते. दरम्यान शंकर चोडणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष धाकू मडर्ककर हे डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहेत, कारण जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ तेव्हा संपुष्टात येणार आहे.