‘आंखों की गुस्ताखियां’मध्ये शनाया
विक्रांत मैसीच्या नायिकेच्या भूमिकेत
संजय कपूरची 24 वर्षीय कन्या शनाया आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आंखों की गुस्ताखियां या चित्रपटात ती विक्रांत मैसीसोबत अभिनय करणार आहे. शनाया यात एक थिएटर आर्टिस्ट म्हणून भूमिका साकारणार आहे. तर विक्रांत मैसी हा एका दृष्टीहीन संगीतकाराच्या भूमिकेत असेल. या दोघांचे प्रमाण आणि आत्म-शोधाच्या परिवर्तनकारी प्रवासावर याची कहाणी आधारित आहे. हा चित्रपट 2025 च्या मध्यास प्रदर्शित केला जाणार आहे.
आंखो की गुस्ताखियां या हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय लेखक रस्किन बाँडन् यांची लोकप्रिय लघुकथा ‘द आइज हॅव इट’वर आधारित आहे. चित्रपट करुणा, इच्छाशक्ती, स्वातंत्र्य, धारणा, स्मृती आणि आत्मविश्वासाच्या पैलूला दर्शविणार आहे. संतोष सिंह हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ब्रोकन बट ब्युटीफुल, अपहरण और रणनीति : बालाकोट अँड बियाँड’ यासारख्या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर याची पटकथा निरंजन अयंगर आणि मानसी बागला यांनी लिहिली आहे.
शनाया यापूर्वी शशांक खेतानच्या ‘बेधडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. परंतु हा चित्रपट गुंडाळण्यात आल्याने तिचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. तर दुसरीकडे विक्रांत मैसीचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.