शान मसूद सल्लागारपदी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाक कसोटी संघाचा कर्णधार शान मसुदची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सल्लागारपदी पीसीबीने नियुक्ती केली आहे. सदर माहिती पीसीबीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली.
36 वर्षीय शान मसूदने आतापर्यंत 44 कसोटी, 9 वनडे आणि 19 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व करताना 6 कसोटी शतकांसह एकूण 3108 धावा जमविल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 44 सामन्यांत 84 डावांत 2550 धावा जमविल्या असून त्यामध्ये 6 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. शान मसूदने 9 नवडे सामन्यात 163 धावा तर 19 टी-20 सामन्यात 395 धावा जमविल्या असून त्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. शान मसूदने 14 कसोटीत पाकचे नेतृत्व केले आहे. अलिकडे मसूदच्या नेतृत्वाखाली पाकने द.आफ्रिकाबरोबरची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि खेळाडूंच्या समस्या या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी आता पीसीबीने शान मसूदवर सोपविली आहे. पीसीबीचे हे पद प्रशासकीय असल्याचे सांगण्यात आले.