अभिनयाच्या क्षेत्रात परतणार शमिता शेट्टी
शमिता दीर्घकाळापासून कुठल्याही चित्रपटात दिसून आलेली नाही. मोठ्या पडद्यावरून गायब शमिता मधल्या काळात बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 15 मध्ये दिसून आली. अभिनेत्री अनेकदा स्वत:च्या खासगी आयुष्यावरुन चर्चेत असते. आता अभिनेत्रीला अलिकडेच एका फॅशन शोमध्ये पाहिले गेले. यावेळी तिने स्वत:च्या कारकीर्दीविषयी मनं मोकळं केलं आहे.
2000 साली शमिताने ‘मोहब्बते’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे तिला ओळख मिळाली होती. आदित्य चोप्राच्या चित्रपटात काम केल्यावर अभिनेत्रीला पुरस्कार देखील मिळाला, परंतु नंतर हळूहळू तिची लोकप्रियता कमी होऊ लागली. परंतु खतरों के खिलाडी, बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 15 नंतर तिची फॅन फॉलोइंग वाढली आहे. अशा स्थितीत अभिनेत्रीचे चाहते तिला चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
मी स्वत: चांगल्या प्रोजेक्ट्सची प्रतीक्षा करत आहे. एखादा निर्माता, दिग्दर्शक किंवा कास्टिंग डायरेक्टर कुठल्याही भूमिकेसाठी मला योग्य मानेल, अशी अपेक्षा आहे. मी नेहमीच काम करण्यासाठी तयार असते आणि आता मला काम करायचे आहे असे उद्गार तिने काढले आहेत. अभिनेत्रीला सध्या कुठलाही चांगला रोल ऑफर झालेला नाही, परंतु ती स्वत: चांगल्या भूमिकेची प्रतीक्षा करत आहे.