शमी, बुमराह, कुलदीपचे टीम इंडियात कमबॅक
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर : रोहितकडेच नेतृत्वाची धुरा : यशस्वी जैस्वालची एंट्री, बुमराहही खेळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले असून जसप्रीत बुमराह, फिरकीपटू कुलदीप यादव यांचेही संघात कमबॅक झाले आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वालला वनडे संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. रोहित आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी वानखेडे स्टेडियमवर संयुक्त पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल‘ अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीत होणार असून भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी दुबईत बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
गिल उपकर्णधार, शमी-जैस्वालची संघात एंट्री
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसेल. शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तब्बल वर्षभरानंतर मोहम्मद शमीचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेपासून तो भारतीय संघाबाहेर होता. विशेष म्हणजे, टी 20 व कसोटी क्रिकेट गाजवल्यानंतर डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल वनडे पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय, निवड समितीने ऋषभ पंत व केएल राहुल या दोघांचीही भारतीय संघात वर्णी लागली आहे. अर्थात, प्लेईंग 11 मध्ये पंत की केएल या दोघापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बुमराह, कुलदीप, श्रेयस अय्यरचे पुनरागमन
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या सामन्यात जखमी झालेला जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. अर्थात, बुमराह व कुलदीप यादव पूर्णपणे तंदुरुस्त आहेत का, याबाबत मात्र स्पष्टीकरण दिलेले नाही. मागील काही काळापासून कुलदीप यादव दुखापतीमुळे संघाबाहेर होता, पण त्याचीही संघात वर्णी लागली आहे. हे दोघेही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, शमी, बुमराहच्या समावेशानंतर मोहम्मद सिराजला मात्र संघातून वगळण्यात आले आहे.
मागील काही काळापासून संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरला मात्र लॉटरी लागली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळी करत त्याने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते, याच कामगिरीच्या जोरावर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. विजय हजारे ट्रॉफीत धावाची बरसात करणाऱ्या करुण नायवर व संजू सॅमसन यांना संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
टीम इंडियाचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध सामन्याने करणार आहे. उभय संघांमधील सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईत होईल. यानंतर पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला सामना होणार आहे. टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारताने गट सामन्यांमध्ये अव्वल स्थान कायम राखले तर 4 मार्च रोजी टीम इंडिया उपांत्य फेरीचा सामना खेळेल. भारतीय संघाने सेमीफायनल व फायनलमध्ये प्रवेश केल्यास हे सामने दुबईत खेळवले जातील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचू शकला नाही तर सामने पाकिस्तानच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर होतील.
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड संघ भारत दौरा करणार आहे. ज्यात दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. आयसीसीच्या या स्पर्धेपूर्वी टीम इंडियसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आज (18 जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडकर्ता आणि कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे संघाची घोषणा केली आहे. टी 20 मालिकेतील सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे खेळले जातील. तर वनडे सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होतील. रोहित शर्माकडेच टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. तसेच अजित आगरकर यांनी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट दिली आहे. बुमराह या मालिकेत खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर आधारित असणार आहे. मात्र जर बुमराहला खेळता आले नाही, तर त्याच्या जागी हर्षित राणा याचा समावेश केला जाईल, असं आगरकर यांनी स्पष्ट केले. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेला संघच इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी असणार आहे.