आमदारकीची शपथ घेऊन शंभूराज देसाई थेट मतदारसंघात
कामाचा सपाटा सुरू; सर्व शासकीय विभागांचा आढावा
सातारा
पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी तातडीने मुंबईला जावे लागल्याने मुंबईतला मुक्काम वाढल्याने गत बारा दिवस मतदारसंघात येणे शक्य झाले नाही. शनिवारी विशेष अधिवेशनामध्ये विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर चार तासांचा प्रवास करत तात्काळ पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांच्या आढावा बैठकीसाठी पाटण येथे उपस्थिती लावली.
आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दौलतनगर येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, श्रीमती कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, गटविकास अधिकारी सरिता पवार, गट शिक्षणाधिकारी श्रीमती बोरकर, उपविभागीय कृषी अधिकारी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार, सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सन 2023-24 व 2024-25 या दोन आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षामधून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर बऱ्याच कामांची निविदा प्रक्रिया थांबली होती तर काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेत नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांकरीता वाढीव निधी मंजूर होण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर आहेत. निधीची आवश्यकता असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्नशील असल्याचे सांगत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर रस्ते, ग्रामपंचायत इमारती, जनसुविधा योजनेमधील कामे, साकव, लघु पाटबंधारे विभागाकडील वळण बंधारे व शेतीसाठी आडवे पाट, पाईप लाईन, साठवण बंधाऱ्याची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शासकीय इमारतींची बांधकामे, भूस्खलनबाधित गावातील कुटुंबीयांना पुनर्वसनाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या पक्क्या घरांची बांधकामे तसेच राज्य शासनाच्या अर्थसंकल्प, 2515, प्रादेशिक पर्यटन, कोयना भूकंप, पुरवणी अर्थसंकल्प या लेखाशिर्षामधून मंजूर असलेल्या विकास कामांच्या तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात याव्यात तसेच ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत अशा कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूल व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या संकल्पना राबवित असताना जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली आहे. सदरची कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना करत हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर विभागनिहाय मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.