धर्मवीर संभाजी चौक येथे खोदकाम केल्याने शंभूप्रेमींचा आक्षेप
बेळगाव : धर्मवीर संभाजी चौक येथे फलक बसविण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक परिसरात कोणत्याही प्रकारचे फलक लावून अडथळे निर्माण करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. तरीदेखील फलक उभारल्यास आंदोलन छेडले जाईल, असे शिवप्रेमींनी म्हटले आहे. शंभू स्मारकाशेजारील जागेमध्ये काही दिवसांपूर्वी बसण्यासाठी सिमेंटचे बाक घालण्यात आले आहेत. त्याच्या समोरील भागात सोमवारी खोदकाम करण्यात आले. याबाबत काही शंभूप्रेमींनी खोदकाम करणाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून दिशादर्शक फलक लावला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शंभूप्रेमींनी तीव्र आक्षेप घेत काम बंद करण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधींना याबाबत फोन करून धर्मवीर छत्रपती संभाजी चौक परिसरात कोणत्याही प्रकारचा फलक बसवू नका, अशी सूचना करण्यात आली. त्यांनीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी बोलावून घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी या कामाला आक्षेप घेऊन तातडीने काढलेला खड्डा बुजवा, अशी मागणी संबंधितांकडे केली आहे.