शंभू, दिव्या युवा भारत केसरीचे मानकरी
बेळगाव : मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना कर्नाटक आयोजित राष्ट्रीय निमंत्रितांच्या कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या शंभूने उत्तर प्रदेशच्या यशपालचा पराभव करून युवा भारत केसरी तर महिलांच्या विभागात वासिमची दिव्या शर्माने मंगळूरच्या आदितीचा पराभव करून महिला युवा भारत केसरी हा मानाचा किताब पटकाविला. या स्पर्धेत पुरुष विभागात महाराष्ट्राने 122 गुणासह तर महिला विभागात कर्नाटकाने 87 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
रामनाथ मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत शंभू पुणे व यशपाल यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर, किरण जाधव, डॉ. सतीश चौलीगर, अमोल साठे, बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, मल्लेश चौगुले, चेतन अंगडी, भरत पाटील, महेश लोहार आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्या काही सेकंदात शंभू पुणेने एकेरी पट काढून पायाला मोळी बांधून फिरवत 4 गुण मिळविले.
दुसऱ्या मिनिटाला यशपालने शंभूला रिंगणाबाहेर फेकून 1 गुण घेतला. पण 4 थ्या मिनिटाला शंभूने दुहेरी पटाची मजबूत पकड बांधून 5 गुणांची कमाई केली. त्यावेळी यशपालने आपल्या डाव्या पावित्र्यात आक्रमक चाल करून शंभूला फिरविण्याचा प्रयत्न करीत असताना शंभूने दोन्ही हाताचे हप्ते भरून 2 गुण मिळवित 11-1 अशा गुण फरकाने ही लढत जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला मानाचा किताब व गदा देऊन त्याचा गौरविण्यात आले.
महिलांच्या युवा भारत केसरी स्पर्धेत मान्यवरांच्या हस्ते वासिमची दिव्या शर्मा, आदिती मंगळूर यांच्या कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत दिव्या शर्माने दुहेरी पट काढून आदितीवर 2 गुण मिळविले. लागलीच तिने छडीटांग मारून पुन्हा 3 गुणाची कमाई केली. तिसऱ्या मिनिटाला आदितीने एकेरीपट काढून दिव्यावर कब्जा मिळवित 2 गुण वसुल केले. पाचव्या मिनिटाला दिव्याने आदितीवर कब्जा मिळवत दोनदा दशरंग फिरून 4 गुणांची कमाई करत विजय मिळविला. तिलाही मान्यवरांच्या हस्ते मानाचा किताब, चषक देऊन गौरव करण्यात आले.
पुरुष गटात महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद, कर्नाटक संघाला पहिले उपविजेतेपद तर हरियाणाला दुसऱ्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या विभागात कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राने पहिले उपविजेतेपद तर केरळला दुसऱ्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष अतुल शिरोळे, गंगाधर एम., महेश गुंजीकर, चेतन देसाई, भावेश बिर्जे, दुंडेश नाईक, नागेश सुतार, अमर निलजकर, शाहीन डी., विद्या पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.