For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शक्तिपीठ’ कोल्हापूरमधून झालाच पाहिजे

11:39 AM Mar 09, 2025 IST | Radhika Patil
‘शक्तिपीठ’ कोल्हापूरमधून झालाच पाहिजे
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कोल्हापूरमधून शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध असल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांचे महामार्गाला समर्थ आहे. शेतमालाला बाजारपेठ, व्यापार, उद्योग, दळणवळण अशा सर्वच बाजूंनी जिह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वकांक्षी असा हा प्रकल्प आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे असा निर्धार शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीच्या मेळाव्यात शेतकऱ्यांनी केला. तसेच मूळ आराखड्यानुसाच हा महामार्ग व्हावा, असा ठरावही करण्यात आला.

शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचा मार्केट यार्ड परिसरातील मुस्कान लॉन येथे मेळावा झाला. मेळाव्यास प्रकल्पामध्ये बाधित होणारे जिह्यातील एक हजारहून अधिक शेतकरी उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला, बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा, पूरबाधित क्षेत्रात पिलर उभारुन रस्ते बांधणी करा आदी ठराव मेळाव्यात करण्यात आले. मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

आमदार  क्षीरसागर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह राज्यात केंद्र व राज्य सरकारने जगभरात दखल घेतली जाईल असे अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. मात्र अशा प्रकल्पांना केवळ विरोध करण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. आजही राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासही महाविकास आघाडी करून विरोध होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी विना मोबदला काढून घेतल्या जातील असे सांगत त्यांची दिशाभूल मविआचे नेते करत आहेत. मात्र या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतजमिनींना सर्वाधिक दर देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनाही उच्चांकी दर मिळाला पाहिजे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

खासदार महाडिक म्हणाले, गावाच्या, जिह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र कोल्हापूरचा विकास होऊ नये, विकास खुंटला पाहिजे यासाठीच जिह्यातील काही पुढारी नेहमी काम करत आले आहेत. सध्याही त्यांचा शक्तीपीठाशी काहीही संबंध नाही तरी देखील त्यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करत महामार्गाला विरोध करण्याचे काम सुरू आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. आयोध्या मंदिर, प्रयागराज येथे झालेला महाकुंभ मेळा यामुळे येथील अर्थकारण बदलून गेले. येथील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून गेल्यास येथील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग होणे गरजेचे असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

आमदार पडळकर म्हणाले, कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध असल्याचे चित्र दाखवले गेले आहे. मात्र मेळाव्यात शेतकऱ्यांची संख्या पाहता हा चुकीचा गेलेला संदेश शेतकऱ्यांनींच मोडीत काढला आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे वर्धा ते गोव्याचा प्रवास केवळ आठ ते दहा तासात होईल. बारा जिह्यातील दळणवळणाला गती मिळणार आहे. कोल्हापूर जिह्याच्या बाबतीत सरकार कधीच मागे पडत नाही. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरचे समर्थन आवश्यक आहे. येथील शेतकऱ्यांमध्ये महामार्गाबाबत पसरवलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. शेतकरी हितासाठी महामार्ग किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांना पटवून द्या यामुळे विरोधातील शेतकरीही महामार्गाच्या समर्थनार्थ येतील असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला.

शक्तीपीठ समर्थन समितीचे दौलतराव जाधव यांनी प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, अशी मागणी केली. तसेच महामार्गासाठी जिह्यातील महायुतीच्या नेत्यांची ताकद एकवटली पाहिजे. महामार्ग बाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही त्यांची भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी राजू शिंगाडे सांगवडे, भीमराव कोटकर भुदरगड, जयकुमार पाटील दानोळी, नामदेव ढवण, संजय नांदले, दत्ता पाटील आजरा आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव आदींचे जिह्यातील शेतकरी उपस्थित होते.

  • जिह्यातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणार

महायुती सरकारचा शक्तीपीठ महामार्ग हा महत्त्वपूर्ण असा प्रकल्प आहे. राज्याच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी असा हा प्रकल्प असून महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या भूसंपादनापैकी शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनास जिह्यातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर सरकार देईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

  • शक्तिपीठ विरोधी मोर्चाला राजकीय वास

शक्तीपीठ महामार्ग विरोधात निघणाऱ्या 12 तारखेच्या मोर्चाला राजकीय वास येत आहे. ज्यांनी नेहमीच कोल्हापूरचा विकास खुंटला पाहिजे अशी भूमिका घेतली तेच या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. पण या मोर्चामध्ये प्रकल्प बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असून ज्यांचा या प्रकल्पाशी काही संबंध नाही अशा लोकंचीच संख्या जास्त आहे. बाधित शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे सध्या विरोधात असणारे शेतकरीही पुढील काळात शक्तीपीठ महामार्गास समर्थन दर्शवतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

  • मेळाव्यात झालेले ठराव पुढीलप्रमाणे :

- शक्तीपीठ महामार्ग मूळ आराखड्याप्रमाणेच व्हावा.

- कोल्हापूर जिह्यातील शेतकरी बाधवांना महाराष्ट्रातील विक्रमी मोबदला मिळावा.

- भूसंपादन प्रक्रिया होण्यापूर्वीच नुकसान भरपाईचा बेस्ट दर जाहीर करावा.

- प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत.

- प्रकल्पाअंतर्गत व्यावसायिक प्रयोजनात प्रकल्पबाधिताना प्राधान्य द्यावे.

- पूरबाधित क्षेत्रात पिलर उभारून महामार्ग करावा.

Advertisement
Tags :

.