शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातूनच जाणार
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाची नुकतीच राज्यातील 12 जिह्यांतील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी दोन महिन्यांत मोजणी करून रक्कम निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिह्यात शक्तिपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवरच जिह्यातील महायुतीचे नेते शक्तिपीठ महामार्गासाठी होणारा विरोध कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरातून शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही, असे जरी सुरुवातीच्या टप्प्यात सांगितले असले तरी नृसिंहवाडीसह अंबाबाई तीर्थक्षेत्र गृहित धरूनच हा महामार्ग साकारला जाणार आहे. जिह्यातील सुमारे 61 गावांतून हा महामार्ग जाणार आहे.
‘समृद्धी’च्या धर्तीवर रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते गोवा अंतर 10 तासांत पार करण्यासाठी नागपूर ते गोवा शक्तिपीठ प्रकल्प हाती घेतला आहे. 86 हजार कोटींचा हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. 805 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी गतवर्षी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह राज्य सरकारकडे पाठवला. मात्र महामार्गाला कोल्हापूर, सांगलीत विरोध झाल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो मागे घेतला होता. सरकारने सप्टेंबरमध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली. पण आता राज्य सरकारनेच हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दिला.
प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचेही आदेश दिले आहेत. आदेशानंतर तत्काळ एमएसआरडीसीने पर्यावरण परवानगीसंबंधीचा प्रस्ताव 10 जानेवारीला केंद्र आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आता त्यापुढे जात या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळाने ज्या जिह्यातून हा मार्ग जाणार आहे, त्या जिह्यातील जिल्हाधिकारी, भूसंपादनचे अधिकारी, भूमिअभिलेख अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. दोन महिन्यांत मोजणी करण्याचे, रक्कम निश्चितीचे आदेश बैठकीत दिले. त्यामुळे पूर्व नियोजनाप्रमाणेच हा महामार्ग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महामार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) ते दिग्रज (जि. वर्धा) असा 802 किलोमीटरचा आहे. महामार्ग कोल्हापूर जिह्यातील 60 गावांतून 126 किलोमीटर जाणार आहे. सांगली जिह्यातील 19 गावांसह 12 जिह्यांतील 12 हजार 589 गट नंबरमधील शेतीतून जाणार आहे. नागपूर ते पात्रादेवी या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी नवी अलाईनमेंट केली आहे. त्यानुसार या मार्गाचे सोलापूर ते कोल्हापूर जिह्यापर्यंतचे तीन प्रारूप आराखडे तयार केले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर चर्चा करून पर्याय काढू असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगत असताना दुसरीकडे कोल्हापुरातून हा महामार्ग जाणार नाही, असे जिह्यातील लोकप्रतिनिधी सांगत असतानाच जिह्यातून महामार्ग जाणार असल्याचे प्रारूप आराखड्यातून स्पष्ट होत आहे.
- तीन जिल्ह्यातील 161 गावांचा समावेश
शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर त्यांना विश्वासात घेतल्याखेरीज हा महामार्ग होणार नाही, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गाचा अत्यावश्यक कामात राज्य शासनाने समावेश केला आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिह्यांतील 161 गावांचा समावेश असलेले तीन प्रारूप आराखडे तयार केले आहेत. त्यानुसार या मार्गाच्या नव्याने अलाईन्मेंट केल्या आहेत. या महामार्गाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नव्याने अलाईन्मेंट (मार्गरचना) केली असली, तरी हा मार्ग जिह्यातील 61 गावांतून जाणार आहे, असेच स्पष्ट होत आहे.
- तीन मार्गरचना तयार
नव्याने तयार केलेल्या या प्रारूप आराखड्यानुसार एक अलाईन्मेंट 324.55 किलोमीटरची आहे. त्यासाठी 3,970 हेक्टर जमीन संपादित होणार असून त्याकरिता 21 हजार 582 कोटी खर्च येईल. दुसरा प्रारूप आराखडा 306 किलोमीटर लांबीचा आणि 20 हजार 362 कोटीचा तयार केला आहे. यासाठी 3,682 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तिसऱ्या आराखड्यानुसार तयार केलेल्या अलाईन्मेंटप्रमाणे हा मार्ग सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिह्यात 305 किलोमीटर लांबीचा असेल. त्यासाठी 3,672 हेक्टरची आवश्यकता असून 20 हजार 295 कोटींचा खर्च होणार आहे.
- शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाऐवजी सुचवला अन्य पर्याय
सध्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असली, तरी अनेक गावांतील शेतकरी, ग्रामस्थांनी या मार्गाला विरोध दर्शवला असून त्यांनी शक्तिपीठ महामार्गाला पर्याय सुचवला आहे. हा महामार्ग सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ व वर्धा अशा 12 जिह्यांतून जाणार आहे. यात हजारो शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग नुकत्याच झालेल्या सोलापूर-मिरज महामार्गावरून कोल्हापूर येथे एन.एच. 4 महामार्गाला जोडावा. या महामार्गावरून, कोल्हापूर येथून गोव्याला जाण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गाने निपाणी-देवगड या नुकत्याच झालेल्या महामार्गावरून, संत बाळुमामा मंदिरापासून जलद गोव्याला जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. सरकारने यासाठी या गावांची सुनावणी घ्यावी, अशी कोल्हापूरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
- शक्तिपीठ महामार्ग जाणारी गावे
जिल्ह्यातील 61 गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील 7, शिरोळ 5, करवीर 9, कागल 13, भुदरगड 21 तर आजरा तालुक्यातील 6 गावांचा समावेश आहे. यामध्ये कोथळी, दानोळी, निमशिरगाव, चिपरी, तारदाळ, हातकणंगले, तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली, सांगवडे, सांगवडेवाडी, सावर्डे, हालसवडे, निरळी, कागल रस्ता विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, एकोंडी, व्हन्नूर, सिद्धनेर्ली, बामणी, केनवडे,सावर्डे खुर्द, सावर्डे बुद्रुक, सोनाळी, कुरणी, निढोरी, आदमापूर, कूर, मळगे खुर्द, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, सोनाळी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, दासेवाडी, कारीवडे, धाबिल, शेळप, पारोळी, आंबेवाडी आदी गावांचा समावेश आहे.