शकील, रिझवान यांची नाबाद अर्धशतके
वृत्तसंस्था / मुल्तान
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान पाकने विंडीजविरुद्ध पहिल्या डावात 41.3 षटकात 4 बाद 143 धावा जमविल्या. सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी नाबाद अर्धशतके झळकविताना चौथ्या गड्यासाठी अभेद्य 97 धावांची भागिदारी करत संघाला सावरले. पावसामुळे पहिल्या दिवशी बराच खेळ वाया गेला.
उभय संघात दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाऊस आणि खराब हवामानामुळे उपाहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर विंडीजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सच्या भेदक माऱ्यासमोर पाकचे 4 फलंदाज केवळ 46 धावांत तंबूत परतले होते.
सील्सने सलामीच्या मोहम्मद हुरेराला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मोतीने कर्णधार शान मसुदला झेलबाद केले. मसुदने 29 चेंडूत 1 चौकारांसह 11 धावा केल्या. सील्सने कमरान गुलामला 5 धावांवर पायचित केले. सील्सने पाकला आणखी एक धक्का देताना अनुभवी बाबर आझमला 8 धावांवर झेलबाद केल्याने पाकची यावेळी स्थिती 13.3 षटकात 4 बाद 46 अशी होती.
सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी अभेद्य 97 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी पाकने 28 षटकात 4 बाद 86 धावा जमविल्या होत्या. विंडीजच्या गोलंदाजांना शेवटच्या सत्रामध्ये पाकची ही जोडी फोडता आली नाही. सौद शकीलने 86 चेंडूत 4 चौकारांसह तर रिझवानने 78 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबविण्याचा निर्णय घेतला आणि पाकने दिवसअखेर 41.3 षटकात 4 बाद 143 धावा जमविल्या. शकील 4 चौकारांसह 56 तर रिझवान 7 चौकारांसह 51 धावांवर खेळत आहेत. विंडीजतर्फे सील्सने 21 धावांत 3 तर मोतीने 45 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव 41.3 षटकात 4 बाद 143 (सौद शकील खेळत आहे 56, मोहम्मद रिझवान खेळत आहे 51, मसूद 11, हुरेरा 6, बाबर आझम 8, कमरान गुलाम 5, अवांतर 6, सील्स 3-21, मोती 1-45)