Shahu Maharaj: ऐतिहासिक कागद उजेडात, शाहू राजांनी 'मिशन' ला दिली साडेसहा एकर जमीन
मिरजेतील प्रसिद्ध मिशन इस्पितळाला साडेसहा एकर जमीन देणगी स्वरुपात दिली
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : राजर्षी शाहू महाराजांनी मिरजेतील प्रसिद्ध मिशन इस्पितळाला साडेसहा एकर जमीन देणगी स्वरुपात दिली होती. त्यासंदर्भातील सन १९१२ चा पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूरचे तत्कालीन पॉलिटिकल एजंट मेरीवेदर यांनी त्यासंदर्भात मिरज संस्थानला पाठविलेली पत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाली आहेत. या पत्रांवरुन राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांच्या वैद्यकीय कार्यात केलेल्या अमूल्य मदतीची माहिती मिळते.
कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाज सुधारक होते. समाजात वेगवेगळ्या स्तरातील लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, कलाकार, खेळाडू यांना त्यांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच कोल्हापूरसह महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संस्था उभ्या राहिल्या. त्यांच्या काळात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणांचा पाया रचला गेला.
राजर्षी शाहू महाराज यांनी वैद्यकीय सेवा करीत असलेल्या मिशनरींना केलेली मवत ही सर्वश्रुत आहे. कोल्हापूर, कोडोली, मिरज येथील मिशनऱ्यांना त्यांनी आर्थिक मदतीशिवाय त्यांच्या संस्था उभारणीसाठी जमिनीही देणगी स्वरुपात दिल्या. मिरजेतील अमेरिकन प्रेसब्रिटेरियन संस्थेचे डॉ. विल्यम वॉन्लेस यांच्याशी राजर्षी शाहूंचे मित्रत्वाचे संबंध होते.
डॉ. वॉन्लेस यांनी राजर्षी शाहूवर वेळोवेळी उपचार केले होते. डॉ. वॉन्लेस यांच्या पत्नी मेरी वॉन्लेस यांनी केलेल्या निरपेक्ष सेवेची आठवण ठेवून शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे मेरी वॉन्लेस हॉस्पिटलची उभारणी केली. डॉ. वॉन्लेस यांनी सन १८९४ मध्ये मिरजेत भव्य अशा मिशन इस्पितळाची उभारणी केली. या इस्पितळात देशभरातून रुग्ण येत असत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉ. वॉन्लेस यांनी इस्पितळाचा विस्तार करायचे ठरविले. मात्र, त्यासाठी जागेची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. राजर्षी शाहूंच्या कानावर ही वार्ता गेल्यानंतर त्यांनी मिशन हॉस्पिटलच्या समोर असणारी सुमारे साडेसहा एकर जमीन डॉ. वॉन्लेस यांना वेणगी स्वरुपात दिली आहे.
सन १९१२ साली राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांना विलेल्या या जमिनींसंदर्भातील पत्रव्यवहार नुकताच मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाला आहे. यामध्ये सवर जमिनीचे मिरज संस्थानिकानी अधिकृत नोंदणी करुन द्यावी, यासाठी कोल्हापूर दरबार, तत्कालीन पॉलिटिकल एजंट आणि मिरज संस्थानात झालेला पत्रव्यवहार आहे.
दक्षिण मराठासंस्थानचे तत्कालीन पॉलिटिकल एजंट ऐतिहासिक कागद उजेडात मेरीवेदर यांनी वोन डिसेंबर १९१२ रोजी मिरज संस्थानिकांना पत्र पाठवून राजर्षी शाहूनी डॉ. वॉन्लेस याना देणगी विलेल्या जमिनीची नोंदणी करुन देण्यास सांगितले आहे. या पत्रात राजर्षी शाहूंनी मिशन इस्पितळाच्या समोर असलेली साडेसहा एकर जमीन मिशन हॉस्पिटलच्या विस्तारासाठी आणि अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी डॉ. वॉन्लेस यांना देणगी दिल्याचा उल्लेख आहे.
राजर्षी शाहूनी दिलेल्या या जमिनीची मिरज संस्थानात नोंदणी करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर झाल्यानंतर २६ फेब्रुवारी १९१३ रोजी डॉ. वॉन्लेस यांना सदरची जमीन नोंदणी करण्यास परवानगी दिल्याचे विसते. कोल्हापूर दरबार आणि मिरज संस्थान यांच्यात झालेल्या या पत्रव्यवहारावरुन राजर्षी शाहूंनी डॉ. वॉन्लेस यांना जमिनीच्या स्वरुपात केलेल्या अमूल्य मदतीची माहिती मिळते.