ऊस दर आंदोलन स्थळी शाहू महाराज दाखल; शेट्टींच्या आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा
कोल्हापूर प्रतिनिधी
सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू असलेल्या ऊसदर महामार्ग बंद आंदोलनस्थळी शाहू महाराजांनी अचानक भेट देत राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला छत्रपतींनी पाठिंबा दिल्याने आणखी बळ मिळाल आहे. दरम्यान शाहू महाराजांनी जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांना हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे, यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली असून संबंधितांनी लवकरात लवकर दखल घेऊन या संबंधी निकाल लावला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राजू शेट्टींच्या आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा
गेल्यावर्षीच्या ऊसाला चारशे रुपये दुसरा हप्ता मिळावा आणि यंदाच्या उसाला 3500 पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या दीड महिन्यापासून वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. दरम्यान या आंदोलनाला साडेतीन-चार च्या सुमारास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी महामार्गावर जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाची प्रशंसा केली असून या आंदोलनावर आजच तोडगा काढण्याची विनंती ही शासन आणि संबंधितांना केली आहे. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले की, इतर सगळ्यांच्या तुलनेत ऊसाचा दर वाढलेला नाही. गेल्या 10 ते 15 वर्षात राजू शेट्टीमुळे दर मिळत आहे. यामुळे संबंधितांनी लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन निकाल लावला पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू
कोणत्याही परिस्थितीत मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच राजू शेट्टी यांनी आतापर्यंत चार कारखान्यांनी 100 रुपये देण्याची तयारी दाखवल्याचे सांगितले. मात्र ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीची अट घालू नका अशी अट घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार 100 रुपये देण्यास तयार झाले आहेत. तसेच बाकी कारखान्यांचं काय करायचं ते पाहू असंही राजू शेट्टी यावेळी शाहू महाराज यांच्याशी बोलताना म्हणाले आहेत. यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीकडे रवाना झाले, या बैठकीत नेमका निर्णय काय होतो याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.