Shahu Maharaj यांनी होमिओपॅथीला दिले प्रोत्साहन, कोथळीत यशस्वी प्रयोग
अनुभवांचे एक पुस्तक नुकतेच उपलब्ध झाले आहे
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : राजर्षी शाहू महाराजांनी विविध कला, क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिना मदत केली. अॅलोपॅथीबरोबरच होमिओपॅथीलाही प्रोत्साहन दिले. प्लेगच्या काळात त्यांनी कोथळी गावात होमिओपॅथी डॉक्टरांच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग राबवले. त्यासंबंधी अनुभवांचे एक पुस्तक नुकतेच उपलब्ध झाले आहे. त्या माध्यमातून राजर्षी शाहूंनी प्लेगसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी कोणते उपाय केले याची माहिती मिळते.
राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाज सुधारक होते. समाजात वेगवेगळ्या स्तरातील लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, कलाकार, खेळाडू यांना त्यांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच कोल्हापूरसह महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संस्था उभ्या राहिल्या.
त्यांच्या काळात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणांचा पाया रचला गेला. शाहू महाराजांनी आधुनिक वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग कोल्हापूर संस्थानातील प्रजेला व्हावा, या हेतूने तज्ञ डॉक्टर नेमले. नवे दवाखाने उभारले. राजर्षी शाहू महाराज यांनी वैद्यकीय सेवा करीत असलेल्या मिशनरींना केलेली मदत ही सर्वश्रुत आहे. कोल्हापूर, कोडोली, मिरज येथील मिशनऱ्यांना त्यांनी आर्थिक मदतीशिवाय त्यांच्या संस्था उभारणीसाठी जमिनीही देणगी स्वरुपात दिल्या.
मिरजेतील अमेरिकन प्रेसब्रिटेरियन संस्थेचे डॉ. विल्यम वॉन्लेस यांच्याशी राजर्षी शाहूंचे मित्रत्वाचे संबंध होते. डॉ. वॉन्लेस यांनी राजर्षी शाहूंवर वेळोवेळी उपचार केले होते. डॉ. वॉन्लेस यांच्या पत्नी मेरी वॉन्लेस यांनी केलेल्या निरपेक्ष सेवेची आठवण ठेवून शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे मेरी वॉन्लेस हॉस्पिटलची उभारणी केली. अॅलोपॅथी उपचारां बरोबरच आयुर्वेद, होमिओपॅथी सारख्या वैद्यकीय शाखांतील डॉक्टरांना प्रोत्साहन दिले.
होमिओपॅथी उपचाराचा प्रयोग प्लेगच्या काळात रुग्णांवर करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश मिळविले. त्यासाठी करवीर संस्थानातील कोथळी या गावात एका होमिओपॅथी डॉक्टरांना पाठवून तेथील रुग्णावर उपचार केले. त्या संबंधीचा सन 1900 मधील एक अहवाल प्रसिद्ध झाला असून तो मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहे. सदरचे डॉक्टर हे सकवारबाई राणीसाहेब यांचे पर्सनल डॉक्टर होते.
या अहवालात त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी होमिओपॅथी उपचारासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची माहिती दिली आहे. कोथळी गावात सन 1898-99 सालात आलेली प्लेगची साथ, आढळलेले रुग्ण, त्यांच्यावर होमिओपॅथीचे केलेले उपचार यांची माहिती आहे. त्यांचा संख्यात्मक सूचीही यामध्ये दिली आहे.
उपचार कसे केले, त्याला रुग्णांनी दिलेला प्रतिसाद याचीही माहिती या अहवालात आहे. सदर डॉक्टरांनी होमिओपथी उपचाराच्या माध्यमातून कोथळी गावात प्लेगचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे व रुग्ण संख्याही कमी झाल्याचे म्हटले आहे. प्लेग निवारणासाठी केलेला होमिओपॅथीचा प्रयोग या गावात यशस्वी झाल्याचे दिसते.