शहांची बैठक महत्त्वाची ठरणार
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत, महायुतीतील विधानसभा जागावाटप अंतिम टप्प्यात असून कुठल्याही परिस्थितीत 160 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत अशी खमकी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. महायुतीत असलेला शिवसेना शिंदे गटही सक्रिय झाला असून शिंदे गटाला 80 तर राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत राहिला तर त्यांना 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. आज अमित शहा हे भाजपच्या नेत्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर महायुतीतील जागावाटपाचे अंतिम चित्र ठरण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्यावर लढविली जाणार? कोणते मुद्दे प्रभावी ठरणार, कोणते अडचणीचे या सर्वाबाबत शहा आज आढावा घेणार आहेत. त्यामुळे अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा हा महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात स्विकाराव्या लागलेल्या पराभवानंतर आता महायुतीने जोर बैठका काढण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतल्यानंतर भाजप नेते अमित शहा आज मुंबईत येत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रात बसला. लोकसभा निवडणुकीत अपयश आले तरी राज्यात भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपली सत्ता कायम ठेवायची आहे, त्याच अनुषंगाने शहा यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत.
पूर्वी शिवसेना भाजपची राज्यात युती असताना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सुर्यभान वहाडणे, पांडुरंग फुंडकर, नितीन गडकरी, एकनाथ खडसे हे युतीमधील जागावाटप आणि इतर निर्णय घेऊन मग दिल्लीला कळवित असत, मात्र आता दिल्लीतील नेते राज्यात आणि राज्यातील नेते जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात. आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप निवडणुकीची तयारी करत आहे. सध्या राज्यात भाजपसाठी म्हणावे तसे वातावरण नसले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सगळ्याच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे शिंदेंच्या प्रतिमेचा शिवसेनेला पर्यायाने युती म्हणून भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकसभेतील कामगिरी पाहता ते भाजपकडे 100 जागांची मागणी कऊ शकतात. गेल्या दोन वर्षात शिंदेंनी आपले नेतृत्व सर्वमान्य असल्याचे भाजप श्रेष्ठींच्या मनावर बिंबवले आहे. गणेशोत्सव असो दहीहंडी असो की नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर-2 असो मुख्यमंत्री शिंदेंनी स्वत:चे जोरदार ब्रॅण्डींग केले. लाडकी बहीण योजना ही सरकारची नसून एकनाथ शिंदेंची असल्याचेच आज महिला सांगताना दिसतात, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढविणार का? हे देखील आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीतील चर्चा किंवा विषय ज्या पध्दतीने बाहेर येतात, त्यामानाने महायुतीत मात्र अजुनही बंद दाराआडच्या चर्चा सुरू असल्याचे दिसते. 2019 ला अशीच बंद दाराआड चर्चा झाल्याने शिवसेना-भाजप युती तुटली, काल नागपूरात उध्दव ठाकरे यांनी अमित शहा यांना बंद दाराआडचे धंदे बंद करा, खुल्या मैदानात या असे आव्हान दिले आहे. अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सतत शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, त्याला वेळोवेळी शरद पवारांनी खोचक शब्दात तर ठाकरे यांनी ठाकरे स्टाईलने उत्तर दिले. आता मात्र शहा यांना कोणत्याही परिस्थितीत राज्यात महायुतीचे सरकारच नव्हे तर भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे. मात्र गेल्या अडीच वर्षाचा विचार करता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी लक्ष्य केले. भाजपच्या जागावाटप प्रक्रियेत जरी फडणवीस यांचा वरचष्मा राहणार असला तरी भाजप कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार हे भाजपला ठरवावे लागणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम असून काल परवापर्यंत फडणवीस यांना इशारा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता थेट अमित शहा यांना देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावऊन इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण विरोधी म्हणून भाजपची झालेली प्रतिमा लक्षात घेता, मराठा चेहरा म्हणून भाजपला एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.
मात्र शिंदे यांना किती जागा मिळणार हे आज ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे शेवटच्या काळात का होईना पुनर्वसन केले, संजय शिरसाट यांना सिडको तर भरत गोगावले यांना एसटी महामंडळ दिले, मात्र भाजपात मात्र महामंडळावर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. एकाला दिला तर दुसरा नाराज होतो, बाहेऊन आलेल्या अनेकांना विधानपरिषदेवर घेतल्याने भाजपातील निष्ठावंत नाराज आहेत, त्याच भावनेतून किरीट सोमय्या यांनी विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुख पदाच्या जबाबदारीचा आदेश धुडकावताना आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जुन्या निष्ठावंतांची नाराजी दुर करण्याचे आव्हानही भाजपसमोर असणार आहे.
महाविकास आघाडीतील पक्षांमधील मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सध्या तरी थांबली आहे, लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी आपली ताकद दाखविली, तिन्ही पक्षाचे स्वत:चे असे
पॉकेट आहेत, मात्र महायुतीतील अजित पवार यांचा वावर हा भाजप आणि शिवसेना या दोघांसाठी अडचणीचा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा परफॉमन्सही म्हणावा तसा नसल्याने अजित पवारांबाबत काय? याबाबत आज महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. एकमात्र नक्की भाजपला विधानसभेत काहीही कऊन 160 जागा लढायच्या आहेत, त्यासाठी भाजपने पक्ष पातळीवर पूर्ण तयारी केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी घेतली आहे. मात्र अमित शहा यांनी याला अद्याप मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे शहा आज कोणता निर्णय घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे