Navratri 2025: कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा
कोल्हापूर शहरास पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे
कोल्हापूर : सन 2023 साली कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत घोषणा झाली होती. याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पाठपुराव्यामुळे अधिकृतरित्या कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडील परिपत्रकानुसार गुरुवारी राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला.
कोल्हापूर शहरास पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोल्हापूर जिल्हा राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात आहे.
म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच लोकप्रिय होत असलेल्या कोल्हापूरच्या दसरा महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकला यांचे सादरीकरण इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
येथील कलांना व कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व भावी पिढीला या कलांची माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकाराने शाही दसरा महोत्सव आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन दसरा महोत्सवास भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झालेले किल्ले पन्हाळगड, जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरी मठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर इत्यादी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध आहेत. दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.
यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक रोजगारामध्ये वाढ होण्यास तसेच विकासदर वाढीस मदत होईल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासाठी कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला.
त्यामुळेच कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत २०२५-२६ या वित्तीय वर्षातील आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकमध्ये प्रमुख पर्यटन महोत्सव यादीत समावेश झाला आहे
भवानी मंडप इमारतीस १९१ वर्षे पूर्ण
कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तिपीठापैकी एक पीठ म्हणजेच अंबाबाईचे मंदिर आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी किमान ३० ते ४० लाख पर्यटक राज्यातील तसेच देशातील विविध भागांमधून येत असतात. १९१ वर्षापूर्वी २ ऑक्टोबर रोजी आलेल्या दसरा सणादिवशीच भवानी मंडप कमानीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे भवानी मंडप या इमारतीस यावर्षी २ ऑक्टोबर २०२५ रोजी १९१ वर्षे पूर्ण होत आहेत.