पाक कसोटी संघात शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन
वृत्तसंस्था / लाहोर
आगामी दक्षिण आफ्रिका बरोबर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पाक निवड समितीने 16 सदस्यांचा संघ जाहीर केला असून डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीचा संघात समावेश केला आहे. तब्बल 17 महिन्यानंतर कसोटी संघात आफ्रिदीचे पुनरागमन होत आहे. ही पहिली कसोटी लाहोरमध्ये 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीसाठी पाक संघ समतोल राखण्यासाठी निवड समितीने प्रयत्न केले आहेत. दरम्यान खुर्रम शेहजाद समवेत शाहीन आफ्रिदी नवा चेंडू हाताळेल. नौमनअली आणि साजीद खान यांच्यावर फिरकीची मदार राहील. 25 वर्षीय शाहीन आफ्रिदीने 2024 च्या मे महिन्यात आपली शेवटची कसोटी इंग्लंडबरोबर खेळली होती.
दरम्यान 2023 डिसेंबरपासून आफ्रिदीने केवळ आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडबरोबरच्या पहिल्या सामन्यात संधी दिल्यानंतर त्याला उर्वरित दोन कसोटीसाठी वगळण्यात आले होते. द.आफ्रिका आणि पाक यांच्यातील ही दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहील. पाक संघ व्यवस्थापनाकडून अद्याप अंतिम 16 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण शान मसुदकडे कप्तानपद सोपविण्यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाबर अझम, सौद शकील, सलमान आगा, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, खुर्रम शेहजाद, नौमन अली आणि साजीद खान यांचा मात्र संघात समावेश निश्चित समजला जातो. या मालिकेसाठी द.आफ्रिकेचे नेतृत्व अॅडेन मारक्रेमकडे सोपविण्यात आले आहे.