शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान
राष्ट्रपती भवनात घेतली शपथ : कॅबिनेट मंत्र्यांसंबंधी पुढील काळात निर्णय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
72 वर्षीय शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात त्यांनी सोमवारी पदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ, पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज, तिन्ही संरक्षणदलांचे अध्यक्ष उपस्थित होते. शरीफ मंत्रिमंडळातील सदस्यांची घोषणा पुढील काळात केली जाणार आहे.
शाहबाज हे पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान आहेत. शाहबाज यांना 201 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. शाहबाज हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. यापूर्वी 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यावर ते देशाचे पंतप्रधान झाले होते. शाहबाज यांनी 12 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. ऑगस्ट 2023 पर्यंत ते पंतप्रधानपदावर होते. ऑगस्ट 2023 मध्ये सार्वत्रिक निवडणूक करविण्यासाठी संसदेचे सभागृह विसर्जित करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानात काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले होते.
निवडणुकीच्या 24 दिवसांनी निवड
3 मार्च रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआय समर्थक खासदारांनी इम्रान खान यांच्या समर्थनार्थ घोषणा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरादाखल पीएमएल-एनच्या खासदारांनी ‘लाँग लिव्ह नवाज’ अशी घोषणा दिली होती. 8 फेब्रुवारीला पार पडलेल्या निवडणुकीनंतर नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीने बहुमत प्राप्त करण्यासाठी आघाडी केली आहे. या आघाडीने शाहबाज यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केले होते. पाकिस्तानात 11 फेब्रुवारी रोजी सर्व जागांचे निकाल जाहीर झाले होते. पाकिस्तानात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. परंतु इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक 93 जागा जिंकल्या होत्या.
9 मार्चला राष्ट्रपती निवडणूक
पाकिस्तानात आता 9 मार्च रोजी राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. पीएमएल-एन आणि पीपीपीच्या आघाडीने आसिफ अली झरदारी यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर इम्रान समर्थक आघाडीने महमूद खान अचकजई यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अचकजई यांच्या निवासस्थानी सुरक्षा दलांनी छापे टाकत इम्रान समर्थक आघाडीवर दबाव टाकला आहे. अचकजई यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी सैन्य छुपे मार्ग अवलंबित असल्याचा आरोप होत आहे.