शहापूर महालक्ष्मीदेवी मंदिराचा होणार जीर्णोद्धार
अंदाजे दीड कोटी खर्च येणार : उपतहसीलदारांच्या देखरेखीखाली मंदिर बांधणार
बेळगाव : शहापूरचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. मंदिराच्या भिंती पावसामुळे कमकुवत झाल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपतहसीलदारांच्या देखरेखीखाली मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. महालक्ष्मी देवीचे मंदिर पुरातन असल्याने सद्यस्थितीला ते जीर्ण झाले आहे. त्यामुळे मंदिराच्या भिंती पावसामुळे केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामाची स्थिती तपासण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपतहसीलदारांची नेमणूक करत बांधकाम करण्याची सूचना केली.
मंदिराचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरिकांच्या देणगीतून अंदाजे दीड कोटी रुपये खर्च करून मंदिर उभारले जाणार आहे. यापूर्वी काही देणगीदारांनी दिलेली देणगी बँकेमध्ये ठेवण्यात आली होती. देणगीची रक्कम व्याजासह माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी नव्या खात्यामध्ये जमा केली आहे. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपतहसीलदार, साहाय्यक आयुक्त तसेच धर्मादाय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या बैठकीला नवी गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, सराफ गल्ली, आचार्य गल्ली, खडेबाजार, लक्ष्मीरोड, आनंदवाडी, अळवण गल्ली, भोज गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, गाडेमार्ग, नाथ पै चौक, महात्मा फुले रोड येथील नागरिक उपस्थित होते. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रमाकांत कोंडुस्कर, नेताजी जाधव, शिवाजी कुरणकर, अनुप कुट्रे, राजू उंडाळे, निखिल मासेकर, संदीप जाधव, प्रसाद जाधव, गजानन गैंडाडकर, जितेश जाधव, मंदार काकेरू यासह इतर कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. भाविकांनी आपली देणगी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शहापूर शाखेमध्ये खाते क्र. 326221010000072 (आयएफसी कोड-यूबीआयएन0932621) या खात्यावर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.