शॅक वितरण अखेर मार्गी
इच्छुकांची पणजीत गर्दी : सोडत पद्धतीचा अवलंब
पणजी : पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शॅक वाटप प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काल मंगळवारी इच्छुकांनी पणजीत मोठी गर्दी केली. परंतु खात्याने शॅकवाटपासाठी सोडत पद्धतीचा अवलंब केल्यामुळे अनेकांना हिरमुसले होऊन परतावे लागले. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच उत्तर गोव्यातील शेकडो इच्छुक पणजीत पर्यटन भवनबाहेर जमा झाले होते. शॅक वाटप प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सोडत पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. त्यानुसार एका कापडी पिशवीत टोकन भरण्यात आले होते व त्यातून निघणाऱ्या क्रमांकानुसार संबंधित क्रमांकधारक व्यक्तीला बोलावून शॅक देण्यात येणार आहे. उत्तर गोव्यातील कळंगूट, हरमल, कांदोळी, केरी, मांद्रे, हणजूण, मोरजी, वागातोर, शापोरा, शिरदोन आदी किनाऱ्यांवर शॅक उभारण्यासाठी सोडतीची प्रक्रिया होणार आहे. शॅक वितरण तीन वर्षांसाठी नवीन पर्यटन हंगाम सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त विलंबानंतर समुद्रकिनारी भागात शॅक वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ष 2023 ते 26 या कालावधीसाठी उत्तर गोव्यात 259 आणि दक्षिणेतील 105 मिळून एकूण 364 शॅक्सना परवाने देण्यात येणार आहेत. वाटप तीन वर्षांसाठी असले तरी परवाना दरवर्षी नूतनीकृत करावा लागणार आहे.