‘शादी में जरूर आना 2’ येणार
बॉलिवूडचा 2017 मधील सुपरहिट चित्रपट ‘शादी में जरूर आना’ आता एका नव्या अध्यायासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या सीक्वेलमध्ये दोन नवे चेहरे अभय वर्मा आणि नितांशी गोयल मुख्य भूमिकेत असतील. पहिल्या चित्रपटात राजकुमार राव आणि कृति खरबंदाच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर यावेळी कहाणीला नवी मानसिकता, नवा काळ आणि नव्या जोडीसह सादर केले जाणार आहे. ‘मुंज्या’ फेम अभय वर्मा आणि ‘लापता लेडीज’ची नितांशी गोयल या कलाकारांवर दिग्दर्शक रत्ना सिन्हाने भरवसा दाखविला आहे. नवा चित्रपट बनारस मीडियाच्या बॅनर अंतर्गत निर्माण केला जात आहे. पहिल्या भागात छोट्या शहरातील साधेपणा, राजकारण आणि प्रेमातील गुंतागुंत चांगल्याप्रकारे दाखविण्यात आली होती. अभय हा ‘मुंज्या’ या चित्रपटामुळे एक दमदार अभिनेता म्हणून नावारुपास आला आहे. तर नितांशीला ‘लापता लेडीज’मधील प्रभावी अभिनयासाठी मोठी प्रशंसा मिळाली होती. दोन्ही युवा कलाकारांची ही जोडी ‘शादी में जरूर आना 2’ च्या कहाणीला मोठे यश मिळवून देऊ शकते.