सेवालाल मानवतावादी संत
डॉ. सुरेखा राठोड, ‘कुमार गंधर्व’मध्ये जयंती
प्रतिनिधी/ बेळगाव
सेवालाल हे मानवतावादी संत होते. दुर्गादेवीचे उपासक होते. आपल्या हयातीत त्यांनी अनेक चमत्कार केले. लोकांना सन्मार्ग दाखवला. धूम्रपान-मद्यपान करू नका, चोरी करणे हा दुर्गुण आहे, असे उपदेश त्यांनी समाजाला केले. त्यांचा उपदेश स्वीकारून प्रत्येकाने जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्य बंजारा संस्कृती-भाषा अकादमीच्या सदस्या डॉ. सुरेखा राठोड यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड-सांस्कृतिक खाते व महापालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिरात शनिवार दि. 15 रोजी संत सेवालाल जयंती साजरी झाली. या कार्यक्रमात विशेष व्याख्यात्या म्हणून डॉ. राठोड बोलत होत्या.
समाज सुसंस्कृत व्हावा, त्यांनी उत्तमप्रकारे जीवन जगावे, असे संत सेवालाल यांचे मत होते. त्यानुसार त्यांनी कार्य केले. त्यांचा आदर्श केवळ बंजारा समाजालाच नव्हे तर सर्व समाजाने घेण्यासारखा आहे, असेही डॉ. राठोड म्हणाल्या. कार्यक्रमाला कन्नड-सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, नगरसेविका लक्ष्मी राठोड, एम. टी. राठोड, आर. टी. राठोड, नारायण राठोड, मोहनकुमार लमाणी यासह बंजारा समाजातील अनेक नेते व समाजबांधव-भगिनी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी संत सेवालाल यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सम्राट अशोक चौकात प्रतिमेचे पूजन आमदार राजू सेठ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत विविध वाद्यपथकांचा समावेश होता. महापौर सविता कांबळे, उपायुक्त उदयकुमार तळवार, समाजकल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी, जिल्हा अनुसूचित वर्ग कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली यासह समाज नेत्यांचा मिरवणुकीत सहभाग होता.