ओलमणी येथे गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर
गटारींची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष : पावसाळ्यापूर्वी गटारी स्वच्छ करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
ओलमणी गावातील गटारींची गेल्या दोन वर्षापासून साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गटारी तुंबुन गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी व गाळ, पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावरून वाहत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ओलमणी गावांमधील प्रत्येक गल्लीच्या रस्त्यांना सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सी. सी. गटारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र गटारीचे बांधकाम अयोग्य पद्धतीने करण्यात आल्यामुळे सदर गटारीतून पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी गटारी तुंबुन दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. टाकाऊ कचरा तसेच प्लास्टिक कचरा नागरिक राजरोसपणे गटारीतच फेकून देतात, त्यामुळे देखील गटारी तुंबण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. वास्तविक पाहता ग्राम पंचायतीने किमान वर्षातून एकदा तरी गटारीतील गाळ व कचरा काढून गटारीतील पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची गरज आहे. मात्र ग्राम पंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
गेल्या दोन वर्षापासून गावातील गटारींची साफसफाईच करण्यात आली नाही. त्यामुळे गटारी तुंबुन दुर्गंधीयुक्त पाणी गावातील नळपाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिन्यांमधून तसेच सार्वजनिक विहिरीच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यात देखील मिसळण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच गावातील अनेक नागरिकांनी आपली वाहने पार्किंग करण्यासाठी सार्वजनिक गटारीवर स्लॅब, फरशी आदी घालून बंद केल्यामुळे देखील गटारी तुंबण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र गटारी तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबरच गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी व कचरा रस्त्यावर वाहून येत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तरी जांबोटी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी ओलमणी येथील गटारींची साफसफाई करून सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.