विद्या वसंत पार्कमध्ये सांडपाणी तुंबले
कोल्हापूर :
कळंबा येथील उपनगरातील बापूरामनगर जवळील विद्या वसंत पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गटारातील सांडपाणी तुंबून राहिले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून रहिवासी या समस्येचा सामना करीत असून,डांस, माशा, दुर्गंधी याचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील कॉलनीतील अनेकांना डेंगू, चिकन गुनिया यासह अनेक साथीच्या आजाराची लागण झाल्याचे चित्र आहे. दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
या समस्येविषयी सोमवार महापालिका प्रशासनाला कॉलनीतील नागरिकांच्या वतीने सांडपाण्याची तात्काळ निर्गत करावी यासाठी निवेदन देण्यात आले. पुढील पंधरा दिवसांमध्ये प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान या कॉलनी मध्ये सांडपाणी निर्गत करण्यासाठी महापालिकेने गटारी बांधलेली नाहीत. त्यामुळे येथील दैनंदिन निर्माण होणारे सांडपाणी मुख्य रस्त्यावर, रिकामे प्लॉट या ठिकाणी तुंबून राहत आहे. निवेदनात म्हटले आहे विद्या वसंत पार्कमध्ये शंभरहून अधिक प्लॉट पाडण्यात आले असून त्यावरती अनेक नागरिकांनी रहिवासासाठी साधी घरे, बंगलो बांधले आहे. येथून घरफाळा व पाणीपट्टीच्या स्वरूपात महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडत असते. मात्र अप्रुया निधीमुळे कॉलनीतील अनेक विकास कामे रखडल्याचे चित्र दिसत आहे. कॉलनी मधील अनेक गल्लीमध्ये गटारी बांधलेली नाहीत. तसेच सांडपाणी निर्गत करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे येथील अनेक घरामधील दैनंदिन निर्माण होणारे सांडपाणी रस्त्यावर व रिकाम्या प्लॉटच्या ठिकाणी तुंबून राहत असल्यामुळे तळ्याचे स्वरूप येत आहे. तसेच डास, माशा, दुर्गंधी याचा प्रादुर्भाव वाढला असून अनेकांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. अधिक्रायांनीही कॉलनीला भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र येथील नागरी सुविधा जैसे थे आहेत.
त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज महापालिका प्रशासनाशी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निवेदनावरती कॉलनीतील राजू धोंडफोडे, शशिकांत कदम, रमेश पाटील, बबन दाभाडे, भागोजी कुंभार, सुनील मोहिते, किरण कदम, सुलोचना दाभाडे, अर्चना कदम, रुक्मिणी धोंडफोडे, वृषाली कदम, मंजिरी पवार, उषा कुंभार, माया दाभाडे यासह अनेक नागरिकांच्या सह्याचे निवेदन दिले आहे.
सांडपाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरात डांस, माशा, दुर्गंधी याचा प्रादुर्भाव वाढला आहे शहारा नजीकच्या उपनगराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र, त्यादृष्टीने आवश्यक त्या सुविधा मिळत नाही. मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागते. लोकप्रतिनिधी नसल्याने तक्रारी तरी कुठे करणार
सुलोचना दाभाडे नागरिक विद्या वसंत पार्क