कळे गावातील सांडपाणी थेट नदीत, 10 गावांमध्ये अतिसारची लागण
कोल्हापूर :
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कळे गावातील बहुतांशी सांडपाणी नाल्याद्वारे थेट कुंभी- धामणी नदीत मिसळत असून दहा गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरचे सांडपाणी नदीत न सोडता त्याची अन्यत्र विल्हेवाट लावावी या मागणीबाबतचे पत्र परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी कळे ग्रामपंचायतीस दिले आहे. पण त्याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सुमारे 10 गावांमध्ये अतिसाराची लागण झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सांडपाणी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी जाणाऱ्या मार्गावर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले. परिणामी गावातील बहुतांशी सांडपाणी नाल्यातून थेट कुंभी- धामणी नदीत मिसळत आहे. सध्या कळे- सावर्डेच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी अडवले आहे. अशा परिस्थितीत कळे गावातील सांडपाणी दररोज मोठ्या प्रमाणात नदीत मिसळत आहे.त्यामुळे दिवसेंदिवस पाणी दूषित होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. या बंध्रायातील पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडले जाते. तोपर्यंत कुंभी-धामणी नदीची गटारगंगा बनणार आहे.
सांडपाण्यामुळे मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, सांगरुळ , मरळी, चिंचवडे, भामटे, कळंबे, आडुर, कोपार्डे आदी गावात अतिसार आणि कॉलरा सदृश आजाराची साथ पसरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ‘अलर्ट ‘मोडवर आला आहे. पाणी नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा केल्या जाण्राया नळांना कोठे गळती आहे का? हे देखील पाहिले जात आहे. पण यामध्ये कोणताही दोष आढळत नसून कळे गावातील सांडपाणी हेच अतिसाराच्या साथीचे प्रमुख कारण समोर आले आहे.
सांडपाण्याची तातडीने अन्यत्र विल्हेवाट लावण्याची गरज
कळे परिसरातील गावांमध्ये अतिसाराचे रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. पण सांडपाणी नदीत मिसळण्यापासून रोखून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.