युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर
वृत्तसंस्था/ब्रसेल्स
युरोपमध्ये भीषण उष्णतेमुळे मागील 10 दिवसांमध्ये 2300 जणांना जीव गमवावा लागला आहे. एका शास्त्राrय विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. पश्चिम युरोपच्या मोठ्या हिस्स्याला सध्या अत्याधिक उष्णतेला सामोरे जावे लागतेय. स्पेनमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले असून फ्रान्सच्या जंगलांमध्ये वणवा पेटला आहे. बार्सिलोना, माद्रिद, लंडन आणि मिलानसमवेत 12 शहरांमध्ये तापमान 4 अंशाने वाढले आहे.
इंपीरियल कॉलेज लंडन आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या शास्त्रज्ञांकडून करण्यात आलेल्या अध्ययनानुसार मागील 10 दिवसांमध्ये अनुमानित 2300 लोकांच्या मृत्यूपैकी 1500 मृत्यू हवामान बदलाशी निगडित होते. हवामान बदलामुळे तापमान पूर्वीच्या तुलनेत खुपच अधिक वाढल्याने ही स्थिती आणखी धोकादायक ठरल्याचे इंपीरियल कॉलेज लंडनमधील संशोधक डॉ. बेन क्लार्क यांनी म्हटले आहे.
संशोधकांनी उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंचा अनुमान लावण्यासाठी महामारी शास्त्राrय मॉडेल आणि ऐतिहासिक मृत्यूदराच्या आकडेवारीचा वापर केला. पश्चिम युरोपने यावेळी सर्वात उष्ण जूनला अनुभवले असल्याचे युरोपीय महासंघाच्या कोपर्निकस हवामान बदल सेवेने म्हटले आहे. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या प्रारंभिक कालावधीत अनेक युरोपीय देशांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले. यामुळे आरोग्यसंबंधी इशारे प्रशासनाला जारी करावे लागले आहेत.