श्रीलंकेत भीषण पूरसंकट, आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू
कोलकाता :
श्रीलंकेत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे देशाच्या मोठ्या हिस्स्यात पूर आला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे तेथील जनजीवन कोलमडले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 56 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर पूरामुळे 60 जण बेपत्ता झाले आहेत. श्रीलंकेच्या मध्य पर्वतीय भागांमध्ये स्थिती सर्वात गंभीर आहे. बादुल्ला आणि नुवारा एलिया यासारख्या चहामळे असलेल्या क्षेत्रांमध्ये भूस्खलन होत असल्याने तेथे राहणारे लोक संकटात सापडले आहेत. अनेक घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नद्या आणि जलाशयांची पातळी धोक्याच्या वर असल्याने लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक मुख्य रस्ते भूस्खलन आणि पाणी भरल्याने बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी रेल्वेमार्गांवर दरड कोसळल्याने रेल्वेवाहतुकीवर परिणाम झाला आहे.
घरांच्या छतावर अडकून पडलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. नौदलाची पथके नौकांद्वारे पूरग्रस्त भागात अडकून पडलेल्या परिवारांना सुरक्षित क्षेत्रांमध्ये पोहोचवित आहेत.