आसाममध्ये गंभीर पूरसंकट, 58 बळी
23 लाख लोक प्रभावित
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये सध्या पूरसंकटामुळे हाहाकार माजला आहे. मागील एक महिन्यात पूरामुळे राज्यातील 58 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच 23 लाख लोक प्रभावित झले आहेत. पूरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्वत:च्या अहवालात म्हटले आहे.
पूरामुळे प्राण्यांनाही मोठा फटका बसला आहे. तर अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. राज्यात हजारो लोक बेघर झाले आहेत. ब्रह्मपुत्रा आणि 9 अन्य नद्यांनी नेमाटीघाट, तेजपूर, धुबरी आणि गोलपाडा येथे धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. तर नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असल्याचा दावा मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केला आहे.
577 मदतशिबिरांची स्थापना
पूरसंकटामुळे राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये 577 मदतशिबिरांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या 5 लाख 26 हजारांहून अधिक लोकांनी या शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. भोजन आणि अन्य सहाय्यासाठी वितरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. पूरामुळे 3,535 गावं जलमग्न झाली असून 68,768.5 हेक्टर क्षेत्रातील पीक पाण्याखाली गेले आहे. पूरामुळे धुबरी जिल्हा सर्वाधिक प्रभावित आहे. कछार आणि दरांगमध्येही मोठे पूरसंकट निर्माण झाले आहे. आसाममध्ये गंभीर पूरसंकटामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
काझीरंगामध्ये प्राण्यांना धोका
काझीरंगा नॅशनल पार्कच्या फील्ड डायरेक्टर सोनाली घोष यांनी पार्कमध्ये पूरामुळे आतापर्यंत 114 वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पार्क व्यवस्थापन आणि वन विभागाने अनेक वन्यप्राण्यांना वाचविले आहे, परंतु राष्ट्रीय उद्यानात पूरस्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु पार्कमधील 66 वनशिबिरे अद्याप पाण्यात बुडालेली असल्याने वन्यप्राण्यांवर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. पूरामुळे 15,49,16 प्राणी प्रभावित झाले आहेत.